माणदेशी महोत्सव मुंबईत ९ जानेवारीपासून

माणदेशी फाऊंडेशन संस्थेचा माणदेशी महोत्सव यंदा ९ जानेवारी ते १२ जानेवारी रोजी रविंद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात भरणार आहे. गावाकडील संस्कृतीचा अनुभव देणाऱ्या माणदेशी महोत्सवाचे मुंबईतील यंदाचे चौथे वर्ष आहे. 

सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग असलेल्या माण तालुक्यातील महिला सक्षमीकरणासाठी आणि महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी माणदेशी फाऊंडेशनची स्थापना झाली. दरवर्षी माणदेशी फाऊंडेशनचा माणदेशी महोत्सव मुंबईत भरविला जातो. माणदेशी महोत्सव हा ग्रामीण महिला उद्योजिकांना शहरी बाजारपेठ समजून घेणे आणि शहरातील ग्राहकांशी थेट संवाद साधणे यासाठी तयार केलेला हा मंच आहे.  

काय आहे  महोत्सवात

 मुंबईकरांना या महोत्सवामध्ये माणदेशीची खासियत असलेले माणदेशी जेन, घोंगडी, दळण्यासाठी जाती व खलबत्ते, केरसुण्या, दुरड्या, सुपल्या हे साहित्य खरेदी करता येणार आहेत. तसंच माणदेशी माळरानातली गावरान ज्वारी, बाजरी, देशी कडधान्य, तसेच चटकदार चटण्या व मसाल्यांची चव चाखता येणार आहे. गावाकडचे किल्ले, गावाची चावडी, घराचा ओटा, घरासमोरील पडवी, गुरे-ढोरे या सर्वाचा अनुभव सेल्फी पॉंईटमधून घेता येणार आहे.

यंदा माणदेशी महोत्सवात ९० ग्रामीण उद्योजक आपल्या उत्पादनांद्वारे सहभागी होणार आहेत. त्याचसोबत घरच्या घरी तयार केलेल्या खास सातारी टच असलेल्या विविध चटण्या, पापड, लोणचं, खर्डा, ठेचा, शेव-पापड ते अगदी पेयांपर्यंत सारं काही उपलब्ध आहे. खणाच्या साड्या, कसुती वर्क इ. साताऱ्यातील महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी कारागीरांना देखील महोत्सवासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

 सुतार, लोहार, कुंभार यांची थेट कला येथे पाहण्यास आणि अनुभवण्यास मिळणार आहे. आपण स्वत:च्या हाताने मडकं वा लाटणं बनवू शकता किंवा फेटा बांधायचा कसा हे शिकू शकता. तसेच चपला तयार करणारे, दागिने बनविणारे किंवा कपडे विणणाऱ्या कलाकारांची कला पाहू शकता. दर संध्याकाळी माणच्या मातीचं दर्शन घडविणारे खेळ, लोकनृत्य, लोकसंगीत यांचा देखील आस्वाद उपस्थितांना घेता येणार आहे. खास माण तालुक्यातील गझी लोकनृत्याचा आस्वाद देखील या महोत्सवादरम्यान घेता येणार आहे. शेवटच्या दिवशी उपस्थितांना महिला कुस्त्यांचा आनंद घेता येणार आहे.

यंदा माणदेशी महोत्सवाचे मुख्य आकर्षण प्रसिद्ध गायक मृदुला दाढे-जोशी आणि माण तालुक्यातील आर.जे केराबाई यांचे संगीत एेकायला मिळणार आहे. माणदेशी तरंग वाहिनीचे ग्रामीण कलाकार पथनाट्य सादर करणार आहेत.


हेही वाचा -

तेजस एक्स्प्रेसमध्ये खवय्यांची चंगळ, नास्ता व जेवणात विशेष मेन्यू


पुढील बातमी
इतर बातम्या