जागतिक कुटुंब दिन: 'तो' तुमच्या कुटुंबात फूट पाडतोय!

क काळ असा होता की घरात गप्पांच्या मैफिली सजायच्या... हास्याची जत्रा भरायची... पण आताची परिस्थिती मात्र याच्या अगदी उलट आहे. आज गप्पांची मैफिल भरत नाही ना हास्याची जत्रा... कुटुंबातील सगळे सदस्य एकत्र राहूनसुद्धा वेगवेगळं आयुष्य जगतात. बदलती कुटुंबपद्धती आणि जीवनशैली यामागचं कारण आहेच. पण यामागे आणखी एक कारण आहे ते म्हणजे मोबाइलमध्ये हरवलेलं कुटुंब.

कुटुंबातील प्रत्येकाकडे आज मोबाइल आहे. आई काय तर घरच्या कामात व्यस्त किंवा वेळ मिळाला तर मोबाइलमध्ये अथवा टीव्हीवर मालिका बघण्यात व्यस्त. बाबा मोबाइलमध्ये मॅच बघतायेत किंवा व्हॉट्स अॅपमध्ये गप्पाटप्पा चालल्यात. घरात एखादं शाळेत जाणारं पोरगं असेल तर तो काय तर मोबाइलमध्ये गेम खेळतोय. म्हणजे काय, जो तो मोबाइलच्या विश्वातच हरवलाय. प्रत्येक घरात हीच परिस्थिती आहे. मग अशावेळी एकमेकांसोबत बोलायला वेळ कसा मिळणार? घरातील सदस्याची काय समस्या आहे? हे समजून घ्यायला कुणाला वेळ आहे.  

सोशल मीडियामुळे लांबची नाती जवळ आली आहेत, असं मी अनेकदा एेकलं आहे. अगदी याची उदाहरणं देखील पाहिली आहेत. मात्र जवळची नाती दुरावली हेही तितकंच खरं आहे. आता हेच बघा ना, सोशल मीडियावरील फॅमिली ग्रुपमध्ये कुटुंबातील एकूण एक सदस्य अॅक्टिव्ह असतो. पण प्रत्यक्षात एकाच घरात राहून बोलणंसुद्धा होत नाही.

घरातील वाढत्या अबोल्यामुळे मतभेद तर वाढतातच. शिवाय मनातल्या गोष्टी तुम्ही मनात किती दिवस कुजवत ठेवता. मनात राहून राहून त्या गोष्टी सडतात आणि द्वेषाची भावना निर्माण होते. याचाच परिणाम आपण अबोला घेतो किंवा भांडतो. पण या सर्वात घरातील शांती मात्र भंग होते. त्यामुळे सततची चीडचीड होते. खास करून लहान मुलांमध्ये. घरातला अबोला पाहून ती सुद्धा अबोल होत जातात. घरामध्ये नेहमीच दु:खी आणि उदास चेहेरे देखील लहान मुलांना निरुत्साही करतात. मग अशा वातावरणात मुलं जास्त वेळ थांबणं पसंत करत नाहीत. मग सोशल मीडिया किंवा मित्रांमध्येच जास्त वेळ घालवायला लागतात. एकूणच, घरापासून मुलं दुरावली जातात. साहाजिकच मोठी झाल्यावर त्यांच्या परिवारात देखील हेच चक्र चालतं.

एकत्र कुटुंब पद्धती आजही अनेक घरांमध्ये आहे. मोठी कुटुंब आजही एकत्र राहतात हे खरं आहे. पण ती मनाने किती एकत्र आहेत हे सांगता येणं कठीणच आहे. यासंदर्भातलाच एक किस्सा. तीन भावंड, तीन सुना, त्यांची मुलं आणि आई-बाबा असं एकत्र कुटुंब. दोन मजली बंगलोमध्ये हे कुटुंब राहायचं. प्रत्येकाची स्वतंत्र रूम. तिघं मुलं सरकारी नोकरी करायचे. त्यामुळे संध्याकाळी ७ ला घरात हजर. घरात नऊ-दहा जण असायचे. 

पण प्रत्येकाचं वेगळं विश्व. जेवणाच्या टेबलावर देखील ते एकत्र यायचे नाहीत. तिघं भाऊ आपापल्या बायको आणि मुलांसोबत स्वत:च्या रूममध्ये जाऊन जेवायचे. बिचारे आई-बाबा दोघेच डायनिंग टेबलवर बसून जेवायचे. ना त्यांच्यात संवाद, ना भांडणं. एकदा तिघा भावंडांपैकी एक बाहेरगावी गेला हे त्यांच्या बाबांना चक्क एका आठवड्यानंतर लक्षात येतं. ते घर कमी आणि होस्टेलच जास्त होतं म्हणा ना!

मी दिलेलं उदाहरण तुमच्या घरातील परिस्थितीशी तर नाही ना जुळत? जर अशी परिस्थिती तुमच्या घरात असेल किंवा पुढे जाऊन निर्माण होण्याची शक्यता असेल तर आताच लक्ष द्या. तुमच्या कुटुंबात देखील दुरावा वाढत असेल तर मी सांगितलेल्या काही टिप्स आचरणात आणा...

) मोबाइल, लॅपटॉप, टीव्ही यांसारख्या साधनांचा वापर कमी करावा. दिवसभर मोबाइल आणि कम्प्युटरवर आपण असतोच. घरी आलं की कुटुंबियांसोबत वेळ घालवावा.

) कुटुंबियांसोबत एखादा छंद जोपासा. एकत्रितपणे सायकलिंग करणं, पुस्तकं वाचणं, इनडोअर गेम जसे की कॅरम पत्ते असं काही तरी ट्राय करा.

) धकाधकीच्या आयुष्यात सुट्टी मिळणं कठिण आहे. पण एका दिवसाच्या सुट्टीत देखील कुटुंबियांसोबत आऊटिंगचा प्लॅन करता येऊ शकतो.

) सकाळचा नाष्टा एकत्र करण्याचा प्रयत्न करा. ते शक्य नसेल तर रात्रीचं जेवणं तरी एकत्र करा. यामुळे दिवसभरातील घडामोडी एकमेकांना कळतात.

) घरात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करा. यामुळे मुलांच्या ज्ञानात भर पडेल. याशिवाय मुलांचे विचार तुम्हाला कळतील. कुटुंबियातील सदस्यांच्या मनात काय चालंय हे देखील एकमेकांना कळू शकेल आणि सदस्यांमध्ये अधिक मोकळीक येईल.

कुटुंबात स्पेस प्रत्येकालाच हवा असतो... स्वातंत्र्य प्रत्येकाचीच मागणी असते... मोकळीकही प्रत्येकालाच हवी असते.. पण नातेसंबंधांचं घट्ट पाठबळ नसेल, तर या सगळ्याला काहीच अर्थ नाही. शेवटी वेगळ्या स्पेसमध्ये मोकळीक घेता घेता त्या स्पेसमध्ये आपण एकटेच तर रहात नाही ना? याचाही विचार करणं गरजेचं आहे!


हेही वाचा -

पबजीचं फॅड, भावी पिढीला करतंय मॅड


पुढील बातमी
इतर बातम्या