मराठी सिनेसृष्टीत प्रत्येक दिवसागणिक नवल वाटाव्यात अशा घटना घडत आहेत. आता एक बंगाली दिग्दर्शक मराठी सिनेमाच्या कामात व्यग्र आहेत.
पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांना त्यांच्या बलाढ्य संस्कृती आणि परंपरांचा वारसा आहे. या दोन्हीमध्ये बऱ्यापैकी साधर्म्यही आहे. कला-साहित्य-संस्कृतीसह निसर्ग रचनेतही कमालीचं साम्य आढळून येतं. पश्चिम बंगालचं हे वैभव पहाण्याची संधी दिग्दर्शक शोभो बासू नाग आणि निर्माते प्रीतम चौधरी, विकी शर्मा सहयोगी निर्माते त्यांच्या 'फॅटफिश एन्टरटेन्मेन्ट' प्रस्तुत 'अवांछित' या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांना लवकरच देणार आहेत. नुकतंच या चित्रपटाचं चित्रीकरण पश्चिम बंगालच्या जुन्या आणि नव्या कोलकाता शहरात सुरु करण्यात आलं आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत प्रथम पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शक शोभो बासू नाग यांना दोन दशकांचा मीडिया क्षेत्रातला अनुभव आहे. 'दिवानगी', 'ख्वाईश', 'देवदास' या दर्जेदार चित्रपटांच्या संकलनानं त्यांनी सुरुवात केली. उत्कृष्ट स्टोरीटेलर असलेल्या शोभो यांनी जाहिरात, चित्रपटांसोबतच 'झी नेटवर्क'च्या 'कोर क्रिएटिव्ह टीम' अंतर्गत 'सीक्रेट सुपरस्टार्स', 'रुस्तम', 'करीब करीब सिंगल', 'मणिकर्णिका' अशा अनेक चित्रपटांसाठी काम पाहिलं असून, 'स्टार आनंद', 'टाइम्स नाऊ', 'झी कॅफे', 'झी स्टुडिओ', 'झी बांगला', 'झी बांगला सिनेमा', 'झी अनमोल' या चॅनल्सच्या निर्मितीत योगदान दिलं आहे.
'अवांछित'मध्ये नव्या आणि जुन्या कोलकाताची रूपकात्मक कथा दिसणार असून, ती वडील मधुसूदन गव्हाणे आणि मुलगा तपन गव्हाणे यांच्या नात्याप्रमाणे विभागली आहे. वृध्दाश्रमातल्या नोकरीत गुंतलेल्या मधुसूदन यांचं नकळत त्यांच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होते आणि त्यामुळेच आईने जीव गमावल्याची भावना मनात बाळगून तारुण्यात पदार्पण करणारा तपन त्यांच्याशी खटकून वागू लागतो. बाप-लेकातला दुरावा वाढत जातो. त्यांच्या भावविश्व, नातेसंबंधांची वीण कधी घट्ट तर कधी सैल होत जाते. कसलेल्या मराठी कलावंतांसोबत निर्माण होणाऱ्या या चित्रपटाच्या निर्मितीसाठी बंगाली कलावंतांनीही कंबर कसली आहे. मराठी प्रमुख कलावंतांसोबतच पडद्यामागील बहुतांश कलावंत बंगाली आहेत.
हेही वाचा -
‘पिकासो’च्या प्रेमात महेश भट्ट
सलमानच्या मराठी सिनेमासाठी रंगवली गावातील घरं