मुलींच्या जीवनात काय चाललेलं असतं ते त्यांच्याखेरीज अद्याप कोणालाही समजलेलं नाही. याचाच वेध घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आगामी सिनेमात ‘गर्ल्स’च्या जीवनातील काही पडद्यामागच्या गोष्टीही समोर येणार आहेत.
मुलींच्या मनाचा ठाव घेणं जरा कठीणच असतं असं म्हणतात ते काही खोटं नाही. याचाच अनुभव दिग्दर्शक विशाल देवरुखकर आणि लेखक हृषिकेश कोळी यांनासुद्धा 'गर्ल्स' साकारताना आला. सिनेसृष्टीला 'बॉईज' आणि 'बॉईज २' सारखे जबरदस्त हिट्स दिल्यानंतर विशाल देवरुखकर आणि हृषिकेश कोळी या जोडीला 'गर्ल्स' केंद्रित एखादा चित्रपट करायचा होता. तसंही मुलींच्या दुनियेची सफर घडवणारा विषय मराठी सिनेसृष्टीत फारसा हाताळलेला नाही. अखेर अनेक चर्चांअंती 'गर्ल्स'चा जन्म झाला. हा चित्रपट २९ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मुलींवर सिनेमा करणं थोडं अवघड काम होतं. त्यामुळं या 'गर्ल्स' कशा सापडल्या याबद्दल दिग्दर्शक विशाल देवरुखकर म्हणाला की, मुलींचंही एक वेगळं जग असतं, काही स्वप्नं असतात. त्यांचं हे जग पडद्यावर अद्याप फारसं उलगडलेलं नाही. त्यामुळं याच अनोख्या जगाची ओळख करून देण्यासाठी आम्हाला 'गर्ल्स' हा चित्रपट करायचा होता. मात्र 'बॉईज' आणि ‘बॉईज २' ची लोकप्रियता पाहता 'गर्ल्स' हा चित्रपटही त्याच तोडीचा, धमाकेदार असणं अपेक्षित होतं. त्यात हा विषय मूळात थोडा वेगळा आणि कठीण होता. त्यामुळं हा चित्रपट करताना एक दडपणही होतं. हा विषय कधी काळी हृषिकेशनं हाताळला होता आणि तोच धागा पकडून आता हा चित्रपट येत आहे.
हेही वाचा -
गणपती ‘बाप्पा’ करणार प्रेक्षकांचं मनोरंजन !
आरोह वेलणकरनं अशी दिली चाहत्यांना ट्रिट