आजवर बऱ्याच मराठी सिनेमांनी परदेशातील सिनेमहोत्सवांमध्ये बाजी मारली आहे. त्यांचाच कित्ता गिरवत अनंत महादेवन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'माई घाट : क्राइम नं. 103/2005' या मराठी सिनेमानं मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
मराठी सिनेमांनी मनोरंजनासोबतच कायम वास्तवदर्शी चित्र दाखवत समाजाला आरसा दाखवण्याचा तसंच सत्य घटनांच्या माध्यमातून समाजाला त्याचं खरं रूपा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. 'माई घाट : क्राइम नं. 103/2005' या मराठी सिनेमानंही असंच काहीसं काम करत परदेशातील समीक्षक, ज्युरी आणि रसिकांना भुरळ घातली आहे. एका आईनं पोलीस यंत्रणेविरुद्ध दिलेल्या लढ्याची हेलावणारी कथा असलेल्या 'माई घाट : क्राइम नं. 103/2005' या मराठी चित्रपटानं 'सिंगापूर दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवात' बेस्ट चित्रपटाचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार पटकावला आहे. यापूर्वी कोणत्याही मराठी चित्रपटाला हा सन्मान मिळाला नसल्यानं 'माई घाट : क्राइम नं. 103/2005'चं यश लक्ष वेधून घेणारं ठरतं.
आठ देशातील चौदा चित्रपटांतून पहिल्या सहांमध्ये निवड झाल्यानंतर त्यामधून 'सर्वोत्कृष्ट चित्रपट', 'संकलन' व 'छायाचित्रण' असे पहिल्या श्रेणीतील तीन महत्वाचे पुरस्कार पटकावून बाजी मारलेला आजपर्यंतचा हा एकमेव मराठी चित्रपट ठरला आहे. महिला सबलीकरणाची कथा सांगणारा हा चित्रपट युवा निर्माती मोहिनी रामचंद्र गुप्ता त्यांच्या 'अलकेमी व्हिजन वर्क्स'ची निर्मिती असून, अत्यंत वेगळ्या जातकुळीच्या अंतर्मुख करणाऱ्या सत्यघटनेवरील या चित्रपटात एका महिलेनं दिलेला विलक्षण लढा, त्यावर तिनं मिळविलेला रोमहर्षक विजय याची गाथा सांगणारा आहे.
'माई घाट' हा सिनेमा चार नॅशनल पुरस्कार विजेत्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजल्या गेलेल्या 'मी सिंधुताई सपकाळ' या सिनेमाचे दिग्दर्शक अनंत नारायण महादेवन यांनी दिग्दर्शित केला असून, लेखन आणि संकलनही त्यांनीच केलं आहे. अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या 'सिंगापूर साऊथ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'मध्ये 'माई घाट'नं सात विभागांमध्ये तब्बल सहा नामांकनं मिळवत 'बेस्ट फिल्म', 'बेस्ट एडिटींग', 'बेस्ट सिनेमॅटोग्राफी'चे पुरस्कार आपल्या नावे केले आहेत. हाँग काँग अँड चायनाचे फिल्ममेकर आणि फेस्टिव्हल ऑथॅारीटी असलेल्या रॅाजर गार्सीया यांनीही 'माई घाट'च्या पाठीवर कौतुकाची थाप मारत न्याय व्यवस्थेतील ढिलाई दर्शवणाऱ्या या वास्तवदर्शी सिनेमावर स्तुती सुमनांची उधळण केली आहे. याखेरीज 'द एशियन पॅसिफीक स्क्रीन अवॅार्डस २०१९' च्या स्पर्धेसाठी या सिनेमाची अधिकृत निवड करण्यात आली होती.
हेही वाचा -
अशोकमामांचा तातोबा साकारणार हा कलाकार
अक्षयला आताच का सुचला मेट्रोचा प्रवास?