२ मराठा आंदोलनकर्ते आयसीयूत, सत्ताधारी, विरोधकांना अचानक जाग

मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांचं गेल्या १२ दिवसांपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणाच्या बाराव्या दिवशी काही उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली. यापैकी २ जणांना तातडीने जीटी रूग्णालयातील अतिदक्षता (आयसीयू) विभागात दाखल करण्यात आलं आहे. हा प्रकार घडल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांना आंदोलकाची आठवण झाली. त्यानंतर सहकार मंत्री सुभाष देशमुख तसंच राष्ट्रवादीचे अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत त्यांना पुन्हा आश्वासन दिलं.

१ नोव्हेंबरपासून उपोषण

हिंगोलीतील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक प्रा. संभाजी पाटील आणि अऩ्य कार्यकर्ते १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाचा मंगळवारी बारावा दिवस असताना बाराव्या दिवसाच्या सकाळपर्यंत सत्ताधारी असो वा विरोधक यापैकी कुणीही या उपोषणाची दखल घेतली नव्हती.

इशाऱ्यानंतर जाग

पण उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावून त्यातील दोघांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. या उपोषणकर्त्यांच्या जीवाला काही धोका झाला, तर राज्य सरकार त्याला जबाबदार असेल असं म्हणत मराठा क्रांती मोर्चानं आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिल्यावर सहकार मंत्री आणि इतरांनी आझाद मैदानावर धाव घेण्यास सुरूवात केली आहे.

आश्वासन एके आश्वासन

सहकार मंत्री यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत त्यांच्या मागण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर ठेवू आणि योग्य तो निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं. तर दुसरीकडे अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शवत मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.

राज्य सरकार मराठा समाजाला केवळ आश्वासन देत आहे, पण प्रत्यक्षात कृती न करता मराठा समाजाला खेळवत असल्याचा टोला अजित पवार यांनी लगावला आहे. तर हा विषय हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी उचलत आक्रमकपणे मांडणार असल्याच आश्वासनही त्यांनी कार्यकर्त्यांना दिलं आहे.

प्रकृती नाजूक

सहकार मंत्र्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आपली भेट घेतली. पण त्यातून काहीही ठोस हाती लागेलं नाही. आमच्या दोन कार्यकर्त्यांची प्रकृती नाजूक आहे. त्यामुळं आम्हाला आंदोलन तीव्र केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. सरकार जोपर्यंत कृती करत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.


हेही वाचा-

उपोषणाचा बारावा दिवस, १९ नोव्हेंबरला मराठा बांधव धडकणार मंत्रालयावर

मराठा समाजाचा आता महाराष्ट्र क्रांती सेना पक्ष

पुढील बातमी
इतर बातम्या