गणेशोत्सव मंडळांसाठी अमित ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे धाव

महाराष्ट्राचा सर्वात अावडता सण गणेशोत्वस अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला अाहे. पण गणेशोत्सव मंडळांच्या महापालिकेकडूनच्या समस्या सुटण्याची अद्याप कोणतीही चिन्हे नाहीत. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांच्या समस्या मांडण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांनी पुढाकार घेतला असून रविवारी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे, विभाग अध्यक्ष संतोष धुरी, धनराज नाईक व मुंबईतील विविध गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मंडप उभारणीबाबत पालिकेकडून त्रास

अमित ठाकरे यांनी गणेशोत्सव मंडळांच्या विविध समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. मुंबईतील अनेक गणेश मंडळे जुनी असून त्यातील अनेकांनी रौप्य, सुवर्ण, हिरक महोत्सवी वर्षात पदार्पण केलं अाहे. या सर्व गोष्टी माहित असतानाही महापालिका त्यांना मंडप उभारणीसाठी परवानगी देताना नाहक त्रास देत अाहे, अशी व्यथा अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली.

मुख्यमंत्र्यांचाही सकारात्मक प्रतिसाद

तुम्ही गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करा. कायदेशीर अडचणी तुम्हाला येणार नाहीत. यासंदर्भात राज्य सरकार काळजी घेईल, असं अाश्वासन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित ठाकरे व गणेशोत्सव मंडळांना दिलं. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना फोन लावून गणेशोत्सव मंडळाच्या मंडपांसंदर्भात सूचना दिल्या. गणेशोत्सव मंडळांना सणासंदर्भात कुठल्याही अडचणी येणार नाहीत, अशी ग्वाही त्यांनी दिली.

राज ठाकरेंचे मंडळांना आदेश

गणेशोत्सव मंडळांना गिरगावमध्ये मंडप उभारण्यासाठी मुंबई महापालिकेनं परवानगी नाकारली होती. महापालिकेकडून परवानग्या मिळत नसल्याने मंडळांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली होती. गणेश मंडळांशी झालेल्या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी गिरगावातील गणेश मंडळांना भेट देऊन तुम्ही बिनधास्त मंडप बांधा आणि गणेशोत्सव साजरा करा, असा थेट आदेश दिला होता.

न्यायालयाचे आदेश

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून रस्त्यांवर मंडप उभारण्याबाबत न्यायालयानं गंभीर दाखल घेतली आहे. पादचाऱ्यांसह वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या मंडळांना मंडपांसाठी परवानगी देऊ नये. परवानगी नसताना अडथळा ठरणारे मंडप उभारले गेले तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा, असे स्पष्ट आदेश न्यायालयानं महापालिकेसह अन्य यंत्रणांना दिले आहेत. यामुळेच पालिकेनं मंडप परवानगीबाबतचे नियम कठोर केले. यावर्षी प्रथमच मंडळांकडून मंडप परवानगीसाठी ऑनलाइन अर्ज मागविले आहेत.

१२९५ मंडळाचे अर्जच नाही

मुंबईत रस्त्यावर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या २२०० मंडळापैकी ९०५ मंडळांनी पालिकेकडे मंडप परवानगीसाठी अर्ज केला आहे. त्यात १०८ मंडळांना परवानगी देण्यात आली आहे, तर काही त्रुटींमुळे १८९ मंडळांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. १२९५ मंडळांनी अद्यापही अर्ज केलेले नाहीत.


हेही वाचा -

घरगुती गणपती बाप्पांना फायबरची प्रभावळ

अाता भटजीही मिळवा अाॅनलाइन!


पुढील बातमी
इतर बातम्या