राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे अडचणीत, सरकारी जमीन हडपल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार

सरकारी जमीन हडपल्याप्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. मुंडे यांना हा मोठा दणका मानला जात आहे.

२४ एकर जमीन खरेदी

धनंजय मुंडे यांनी १९९१ मध्ये जगमित्र साखर कारखान्यासाठी २४ एकर जमीन खरेदी केली होती. ही जमीन देवस्थानची असल्याचा दावा करत या व्यवहाराविरोधत राजाभाऊ फड यांनी बर्दापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांनी या तक्रारीची दखल न घेतल्याने फड यांनी औरंगाबाद खंडपिठात फौजदारी याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीवेळी मुंडे यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचे आदेश न्या. पी. व्ही. नलावडे व न्या. मंगेश पाटील यांनी दिले आहेत.

अडचणी वाढल्या

ही सरकारी जमीन असल्याने ती ट्रस्ट किंवा खासगी व्यक्तीला विकत घेता येत नाही, असा आक्षेप फड यांनी घेतला होता. त्यामुळे मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी विनंती त्यांनी याचिकेत केली होती. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर हायकोर्टाने हा निर्णय दिल्याने धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सत्ताधाऱ्यांकडून या प्रकरणावरुन मुंडे यांची कोंडी केली जाण्याची शक्यता आहे.

सुडबुध्दीतून तक्रार - मुंडे

जगमित्र साखर कारखान्यासाठी कोणत्याही संस्थानाची अथवा शासनाची जमीन फसवणुक करून मी घेतलेली नाही. मात्र,  शेतकरी व बँकांचे ५४०० कोटी रूपये बुडवणारे रत्नाकर गुट्टे यांचे प्रकरण मी लावून धरल्यामुळे यांचे जावई राजाभाऊ फड यांनी राजकीय सुडबुध्दीने न्यायालयात तक्रार दाखल केली आहे, असे धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. 


हेही वाचा -

बाॅम्बस्फोट खटल्यातील आरोपीला तिकीट देणं हा लोकशाहीवरील हल्ला- पवार

विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम नकोच- प्रकाश आंबेडकर


पुढील बातमी
इतर बातम्या