तर, शिवसेना नाव बदलून ठाकरे सेना करा, उदयराजेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान

आज के शिवाजी- नरेंद्र मोदी… या पुस्तकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केल्यावरुन सध्या भाजपवर चौफेर टीका होत आहे. त्यावरून शिवरायांच्या वंशजांचं म्हणणं काय? असा प्रश्न करणाऱ्या शिवसेनेला भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी तितक्याच कडक भाषेत उत्तर दिलं. शिवसेना स्थापन करण्याआधी तुम्ही शिवरायांच्या वंशजांची परवानगी घेतली होती का? गरज नसेल, तर शिवसेना नाव बदलून ठाकरे सेना करून दाखवा, असं खुलं आव्हानच त्यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिलं.

दिल्लीतील भाजपचे नेते जयभगवान गोयल यांनी लिहिलेलं हे पुस्तक प्रकाशित होताच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली. नरेंद्र मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करण्यात आल्याने हे सर्व राजे यांना मान्य आहे का?, शिवरायांच्या वंशजांनो बोला...काही तरी बोला...असा प्रश्न शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सातारा गादीचे वारसदार उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे भोसले यांना उद्देशून केला.

हेही वाचा- मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना, भाजपची भूमिका काय?- राऊत

त्यावर प्रतिक्रिया देताना संभाजीराजे आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी संजय राऊत यांनी जपून भाषा वापरण्याचा सल्ला शिवसेनेला दिला. परंतु उदयनराजेंकडून कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. मात्र मंगळवारी उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेसहीत अन्य पक्षांकडून होत असलेल्या टीकेवर भाष्य केलं.

प्रत्येक राजकीय पक्षाकडून शिवाजी महाराजांच्या नावाचा केवळ स्वार्थासाठी वापर करण्यात येतो. सोयीप्रमाणे वापर करायचा आणि सोयीप्रमाणे विसरून जायचं. हीच या पक्षांची रीत आहे. आज मला प्रश्न विचारणाऱ्यांनी शिवसेना स्थापन करताना शिवाजी महाराजांच्या वंशजांची परवानगी घेतली होती का? असा प्रश्न उदयनराजेंनी विचारला.

जसे इतर राजे आपल्या घराण्यांनी ओळखले जातात, तशी शिवाजी महाराजांची ओळख नाही. त्यांना भोसले घराण्याचा राजा नाही, तर रयतेचा राजा म्हणून ओळखलं जातं. ते सर्व जनतेचे राजे आहेत. त्यामुळे त्यांचा आदर करणं, त्यांच्या शिकवणीनुसार आचरण करणं ही सर्वांचीच जबाबदारी आहे. हिंमत असेल तर शिवसेनेने आपल्या पक्षाचं नाव बदलून ठाकरे सेना असं करावं, बघा तुमच्या पाठी किती तरूण राहतात ते? महाशिव आघाडीतलं ‘शिव’ नाव का काढलं? अशा शब्दांत उदयनराजेंनी शिवसेनेवर हल्ला चढवला. 

हेही वाचा- म्हणून केली मोदींची शिवाजी महाराजांसोबत तुलना, लेखकाचा खुलासा

शिवाजी महाराजांचा इतकाच आदर असेल, तर शिवसेनेने दादरमधील पक्षाचं मुख्यालय असलेल्या शिवसेना भवनवर शिवाजी महाराजांच्या वर बाळासाहेबांचा फोटो का लावला? वडापावला महाजारांचं नाव कसं काय दिलं जाऊ शकतं? तेव्हा आदर कुठं जातो? भिवंडीतील दंगल कुणाच्या आदेशावरून घडवून आणली जाते? त्यावेळी महाराजांच्या सर्वधर्म समभावाच्या शिकवणीचं काय होतं? असे प्रश्न उपस्थित करून कुणी काहीही बोलायचं आणि आम्ही ऐकूण घ्यायचं हे यापुढं चालणार नाही, अशा शब्दांत शिवसेनेला तंबी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या