‘जाणता राजा’ एकच, उदयनराजेंचा शरद पवारांना टोला

अलिकडे उठसूठ कुणालाही ‘जाणता राजा’ ही उपाधी दिली जाते. त्यामुळे आपल्याकडे बरेच ‘सो काॅल्ड जाणते राजे’ झाले आहेत. परंतु या देशातच नव्हे, तर जगाच्या पाठिवर छत्रपती शिवाजी महाराज हेच एकमेव ‘जाणता राजा’ आहेत, या शब्दांत उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव न घेता टीका केली.

आज के शिवाजी-नरेंद्र मोदी… या पुस्तकावरून सध्या भाजपवर सर्वपक्षीय विरोधकांकडून टीकेचे बाण सोडण्यात येत आहेत. शिवरायांच्या वंशजांनो बोला? असा प्रश्न विचारत शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही त्यांना डिवचलं. त्यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा खरपूस समाचार घेतला. 

हेही वाचा- तर, शिवसेना नाव बदलून ठाकरे सेना करा, उदयराजेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान

उदयनराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान मोदी यांची तुलना करणारं पुस्तक प्रकाशित झाल्यावर आपल्याला वाईट वाटलं. छत्रपती शिवाजी महाराजांची उंची जगातही कुणी गाठू शकणार नाही. एवढंच काय तर त्यांच्या जवळपासही जाऊ शकणार नाही.  पण अलिकडे 'जाणता राजा' ही उपमा सर्रास कुणालाही दिली जाते. मी त्याचासुद्धा निषेध करतो. आपल्याकडे त्या सो कॉल्ड जाणत्या राजांना ही उपमा कुणी दिली माहीत नाही. पण जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज हेच आहेत. 

छत्रपती शिवाजी महाराज यांची नरेंद्र मोदी यांच्यासोबत केलेली तुलना ज्यांना रूचलेली नाही, त्यांना शरद पवारांना दिलेली ‘जाणता राजा’ ही उपाधी कशी पटली? असा प्रतिप्रश्न भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला होता.  

हेही वाचा- ‘जाणता राजा’ ही उपाधी शरद पवारांना कशी चालते? मुनगंटीवारांचा प्रश्न

पुढील बातमी
इतर बातम्या