येत्या ५ आॅगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होत असताना भाजपने या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यात उत्सवी वातावरण तयार करण्याचं ठरवलेलं आहे. याच उद्देशाने भाजपच्या महाराष्ट्रातील उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडे यांनी या दिवशी राज्यातील सर्व राम मंदिर उघडण्याचं आवाहन राज्य सरकारला केलं आहे.
यासंदर्भात संजय पांडे आणि त्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन इथं भेट घेतली. यावेळी पांडे यांनी राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाच्या दिवशी ५ आॅगस्ट रोजी राज्यातील सर्व राम मंदिर पूजा करण्यासाठी उघडण्याची परवानगी मागणारं निवेदन राज्यपालांना दिलं. त्याआधी पांडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राम मंदिर उघडण्याची मागणी केली आहे.
अयोध्येत होऊ घातलेलं राम मंदिर प्रत्येक हिंदू व्यक्तीच्या भावनेशी जोडलेलं आहे. तब्बल ४५० वर्षांपासून ज्या क्षणांची वाट जगभरातील हिंदू धर्मिय पहात होते, तो ऐतिहासिक क्षण आता जवळ आला आहे. कोट्यावधी जनतेचं स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने जनता अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा स्वत: उपस्थित राहून बघण्यासाठी उत्सुक आहे. परंतु कोरोनाच्या संकटामुळे हे शक्य नाही. म्हणूनच राज्य सरकारने ठिकठिकाणचे राम मंदिर उघडून जनतेच्या श्रद्धेला मोकळी वाट करून द्यावी, जेणेकरून त्यांना मंदिरात पूजा-प्रार्थना करता येईल. त्यातून त्यांना समाधान मिळू शकेल, असं मत संजय पांडे यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा - Ram Mandir: राम मंदिर नक्कीच झालं पाहिजे, पण भूमिपूजनाची ही योग्य वेळ नाही- राज ठाकरे
या शिष्टमंडळात श्री ज्ञानेश्वर मठ ट्रस्टचे अध्यक्ष महामंडलेश्वर स्वामी शंकरानंद सरस्वती, मुंबई भाजपा उपाध्यक्ष अमरजीत सिंह आणि उदयप्रताप सिंह यांचा सहभाग होता.
दरम्यान, राम मंदिर नक्कीच झालं पाहिजे, राम मंदिराचं भूमिपूजनही धुमधडाक्यात झालं पाहिजे. परंतु आता ती वेळ नाही, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमावर आपली भूमिका मांडली आहे. सध्याच्या स्थितीत भूमिपूजन झाल्यावर फार तर त्याची एका दिवसाची बातमी होईल, एका दिवसाच्या चर्चा होतील. त्यापलिकडे आनंद साजरा करण्याची मानसिकतेत कुणीही नाही. राम मंदिर भूमिपूजनाचा आनंद नक्कीच आहे. पण मंदिर प्रत्यक्षात उभं राहिल्यावर जास्त आनंद होईल, असं राज ठाकरे म्हणाले.
येत्या ५ आॅगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे भूमिपूजन होणार आहे. या भूमिपूजन कार्यक्रमासाठी निवडक २०० जणांनाच निमंत्रण पाठवण्यात येईल, अशी माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने