कुख्यात गुंडाचा भाऊ भाजपच्या तिकीटावर लढणार

विधानसभा निवडणुकीचे वारे राज्यभरात वाहू लागले असताना, युतीतून  कुख्यात गुंड छोटा राजन याचा भाऊ दिपक निकाळजे यांना  उमेदवारी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपाइं पक्षाकडून दिपक निकाळजे यांना फलटणची उमेदवारी देण्यात आल्याची माहिती रामदास आठवले यांनी पत्रकारांना दिली. युतीकडून मित्र पक्षांना १८ जागा सोडण्यात आल्या आहेत. त्यापैकी सहा जागा या रिपाइं पक्षाला मिळाल्या आहेत.

शिवसेना-भाजप युतीचा घटक असलेल्या रिपब्लिकन पक्षाने अंडरवर्ल्ड डाॅन छोटा राजनचा भाऊ दिपक निकाळजे यांना फलटणमधून उमेदवारी जाहीर केली आहे. रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिपक निकाळजे यांना चेंबूरची जागा सोडण्यासाठी शिवसेनेने नकार दिला म्हणून त्यांना फलटणमधून लढावं लागत आहे. रिपाइंने निकाळजे यांना तिकीट दिल्यावर भाजप गुंडांना निवडणुकीत उतरवतंय अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.  याआधी मोदींनी गुजरातमधून माफिया पुरुषोत्तम सोलंकी यांना निवडणुकीत उतरवलं होतं आणि त्यांना आपल्या सरकारमध्ये मंत्री केलं, असंही नवाब मलिक म्हणाले.  मराठवाड्यातील नायगावमधून राजेश पवार, परभणीतल्या पाथरीमधून मोहन फड तर मानखुर्द-शिवाजीनगर आणि फलटणमधून अनुक्रमे गौतम सोनवणे आणि दिपक निकाळजे यांना रिपाइंने उमेदवारी देत असल्याचे आठवले यांनी जाहिर केले.


हेही वाचा -

आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीला राज ठाकरेंचा पाठिंबा


पुढील बातमी
इतर बातम्या