राज्याच्या महाधिवक्त्यांनाही राज्यमंत्री पदाचा दर्जा

काही दिवसांपूर्वीच सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आणि शिवसेना उपनेते आदेश बांदेकर यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिल्यानंतर आता राज्य सरकारने महाधिवक्ता अॅड. आशुतोष कुंभकोणी यांनादेखील राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला आहे.

यांना प्रथमच दिला 'हा' दर्जा

त्याबाबतचा शासकीय आदेश विधी व न्याय विभागाने नुकताच जारी केला. राज्यात पहिल्यांदाच महाधिवक्त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईला मिळालेलं राज्यमंत्री पदाचं हे दुसरं पद आहे. एखाद्या देवस्थानच्या अध्यक्षांना प्रथमच राज्यमंत्र्यांचा दर्जा दिल्यानंतर महाधिवक्ता कुंभकोणी यांनाही हा बहुमान देण्यात आला आहे.

राज्यमंत्र्यांना 'ही' सुविधा

राज्यमंत्री म्हणून महाधिवक्ता यांना सरकारी बंगला, मानधनाखेरीज महिन्याला 3 हजार रुपये दूरध्वनीचं भाडं मिळणार आहे. तसंच 20 लाख रुपयांपर्यंतची कार त्यांच्या दिमतीला असणार आहे. न्यायालयीन कामकाजासाठी त्यांना बिझनेस क्लासचं विमान भाडंही मिळेल.

कायदा विभागाचा निर्णय

राज्य सरकारने शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या एक दिवस अगोदर शिवसेनेचे सचिव आणि सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांना राज्य मंत्रीपदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यावरुन राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली होती. त्यानंतर अॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांना राज्य मंत्रीपदाचा दर्जा देण्याचा निर्णय कायदा विभागाकडून घेण्यात आला.

पुढील बातमी
इतर बातम्या