कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पुरेशी खबरदारी घेतली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नका, होळी साजरी करताना तिचं स्वरुप मर्यादित ठेवा. मुंबई पाठोपाठ पुणे, नागपूर येथील विमानतळांवर थर्मल स्कॅनिंगची (thermal scanning at airport) सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पंचतारांकीत हॉटेलमध्ये येणाऱ्या परदेशी नागरिकांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी विधानसभेत सांगितलं.
हेही वाचा- महाराष्ट्रात एकही करोनाग्रस्त रुग्ण नाही, आरोग्यमंत्र्यांची माहिती
विधानसभेत औचित्याच्या मुद्यावर कोरोनासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, आरोग्य विभागाच्या माध्यमातून पुरेशी खबरदारी घेण्यात येत आहे. मी या संदर्भात गेल्या महिन्याभरापासून आरोग्य विभागाच्या (state health department) बैठका घेतल्या आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा (coronavirus) एकही रुग्ण नाही त्यामुळे नागरिकांनी काळजी करु नये तर काळजी घ्यावी. ज्या विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमाने येतात तिथं तपासणीची सोय करण्यात आली आहे. विमानाची साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पुरेशी खबरदारी बाळगण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या.
कोरोनाबाबात नमुने तपासण्याची सुविधा पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत केली आहे. त्यासोबतच मुंबई आणि नागपूर इथंही याची सोय करण्यात आली आहे. राज्यात आवश्यक त्या मास्कचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. प्रसंगी खासगी रुग्णालयांची देखील मदत घेण्यात येत आहे. करोनाबाबतच्या जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेण्यात आली असून शाळा, सार्वजनिक ठिकाणे, रेल्वे व बसस्थानक या ठिकाणी पोस्टर्स, बॅनर्स लावण्यात येणार आहेत.
राज्यात येणाऱ्या होळीच्या (holi festival) उत्सवावर करोनाचा सावट असून या होळीमध्ये कोरोनाचं संकट जळून खाक व्हावं, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी. होळीचा सण साजरा करताना त्याचे स्वरुप मर्यादित ठेवावं. याआधी स्वाइन फ्लूच्या संकटाच्या वेळी दहीहंडी (dahi handi) उत्सवावर मर्यादा आल्या होत्या. अनेक मंडळांनी स्वयंस्फूर्तीनं दहीहंडी उत्सव रद्द केले होते. यावेळी हे भान राखलं जाईल. नागरिकांनी तसं ते राखावं, असं आवाहनही उद्धव यांनी केलं.
हेही वाचा- करोनाच्या संशयित रुग्णांसाठी ४ रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष
यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्य सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील, सुधीर मुनगंटीवार, नितेश राणे, रविंद्र वायकर, सुनील प्रभू, प्रताप सरनाईक, रवी राणा, राम कदम यांनी चर्चेत सहभाग घेतला.