ठाकरे सरकारनं राज्यातील किराणा आणि रेशन दुकानांना वाईन विक्रीसाठी (Wine Sale) परवानी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर आता भाजप नेते अधिक आक्रमक झाले आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही तर महाराष्ट्राचे ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराच ठाकरे सरकारला दिलाय.
‘शेतकरी-कष्टकरी, गरीब, बारा-बलुतेदार अशा एकाही घटकाला राज्य सरकारनं गेल्या दोन वर्षाच्या कोरोना कालखंडात मदत केली नाही. सरकारचे प्राधान्य केवळ आणि केवळ दारुलाच! महाविकास आघाडीचे हे सरकार नेमके आहे तरी कुणाचे? सत्तेच्या ‘नशे’त धुंद सरकारनं गरिबांना थोडी तरी मदत करावी. पेट्रोल-डिझेलऐवजी दारू स्वस्त! दारुबंदी संपवून दारुविक्रीला परवानगी! महाराष्ट्रात नवीन दारुविक्री परवाने देण्याचा निर्णय! आणि आता थेट सुपर मार्केट, किराणा दुकानातून घरोघरी दारू! महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही’, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी टीका केलीय.
राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे. दहा वर्षांपूर्वीचा हा प्रस्ताव आहे. त्यामुळे आज निर्णय घेण्यात आला.
शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. शेतकऱ्यांच्या फल उत्पादनावर वायनरी चालत असल्याने आज हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना त्याबाबतची माहिती दिली.
महाराष्ट्रात बऱ्याच वायनरी आहेत. त्यामुळे आता सरकारनं नवीन पॉलिसी ठरवली आहे. सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक हजार स्क्वेअर फुटापर्यंतच्या सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला ठेवण्याची परवानगी देण्यात येणार आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.
हेही वाचा