‘ईडी’च्या नोटीसवर अनिल परब म्हणाले…

आम्हाला अशी अपेक्षा होतीच, की असं काहीतरी होईल, अशी पहिली प्रतिक्रिया अंमलबजावणी संचलनालयाची (ईडी) नोटीस मिळाल्यानंतर शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा संपताच ईडी कडून अनिल परब यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिशीनुसार अनिल परब यांना ३१ ऑगस्ट रोजी ईडीच्या मुंबईतील कार्यलयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. या नोटिशीनंतर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. 

त्यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना अनिल परब यांनी माध्यमांना सांगितलं की, आज संध्याकाळी मला ईडीची नोटीस मिळालेली आहे. या नोटिशीत मी ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता, ईडीच्या कार्यलायात हजर व्हावं, असं म्हटलेलं आहे. या व्यतिरिक्त त्यामध्ये सविस्तर काहीही लिहिलेलं नाही. केवळ तपासाचा भाग असा उल्लेख आहे. त्यामुळे मला नेमकं कुठल्या तपासासाठी ईडीने आपल्या कार्यालयात बोलावलं आहे, हे आता तरी सांगता येणार नाही. 

साधारण आम्हाला अशी अपेक्षा होतीच, की असं काहीतरी होईल आणि त्याप्रमाणे आता त्याचा कायदेशीर त्याला उत्तर किंवा कायदेशीर सल्ला घेऊन, आम्ही त्याचं उत्तर देऊ. मी आता यावर कुठलाही उल्लेख करणार नाही. मला ते सगळं कारण कळलं पाहिजे. जी कारण कळाल्यावर त्यावरचं कायदेशीर उत्तर मी देईन. कायदेशीर नोटीस आली आहे, त्याला मी अभ्यास करूनच कायदेशीररित्या उत्तर देईल.

दरम्यान, जन आशीर्वाद यात्रेनंतर महाड इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याची सर्वच माध्यमांनी दखल घेतल्यानंतर राणे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. अटकनाट्यादरम्यान अनिल परब पोलिसांना सूचना देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. राणे यांच्या अटकेमागे परब यांचा हात असल्याची चर्चा रंगलेली असताना परब यांच्यावरही पलटवार होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.

पुढील बातमी
इतर बातम्या