आसू आणि हसू

मुंबई - महापालिकेच्या निवडणुकीत यंदा नवरा बायको, आई- वडिल आणि मुले अशाप्रकारे नात्यातील सगेसोयरे निवडणूक रिंगणात उतरले होते. परंतु यामध्ये एकाच घरातील दोन्ही उमेदवार निवडून आले, तर काही ठिकाणी केवळ एकच सदस्य निवडून आला आहे. त्यामुळे या उमेदवारांमध्ये आसू आणि हसू पाहायला मिळत आहे.
शिवसेनेला राम राम करत भाजपात प्रवेश करणारे शिवसेना समर्थक अपक्ष नगरसेवक अॅड. मकरंद नार्वेकर यांनी आपल्या वहिनीसह भाजपात प्रवेश करत अनुक्रमे प्रभाग २२६ आणि २२७मधून निवडणूक लढवली. यामध्ये हर्षिता नार्वेकर आणि मकरंद नार्वेकर हे दोघेही विजयी झाले आहेत. तर शिवसेनेतून भाजपात गेलेल्या बबलू पांचाळ आणि त्यांची पत्नी अनिता हे दाम्पत्यही निवडणूक रिंगणात होत्या. परंतु बबलू पांचाळ यांना पराभव पत्करावा लागला असून, त्यांची पत्नी अनिता पांचाळ या विजयी ठरल्या आहेत. तर रोहिदास लोखंडे आणि सुरेखा लोखंडे या दाम्पत्यांपैकी रोहिदास लोखंडे यांचा पराभव झाला आहे. तर त्यांची पत्नी सुरेखा लोखंडे या विजयी झाल्या आहेत. त्यांनी अभासेच्या वंदना गवळी यांचा पराभव केला. तर रोहिदास लाखंडे यांचा पराभव सपाच्या रईस शेख यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित रावराणे आणि रुपाली रावराणे या दोघांचाही पराभव झाला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे हारुन खान यांची पत्नी ज्योती खान यांचा विजय झाला आहे. तर त्यांचा मुलगा रोशन खान यांचा पराभव झाला आहे.

नवरा-बायको बनले नगरसेवक

भाजपाने अंधेरी पूर्व भागात पटेल कुटुंबाला दिलेल्या उमेदवारीमध्येही दोघे नवरा बायको निवडून आल्या आहेत. प्रभाग ७६मधून केशरबेन पटेल आणि प्रभाग ८१मधून मुरजी पटेल हे विजयी झाले आहेत. केशरबेन पटेल या काँग्रेसच्या माजी नगरसेविका असून, त्यांनी निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केला होता. यापूर्वी २००७ च्या निवडणुकीत मंगला काते आणि तुकाराम काते हे दाम्पत्य निवडून आले होते. 

खासदार शेवाळेंना धक्का

मानखुर्दमधील प्रभाग़ १४१ आणि १४४ या प्रभागातून शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांची पत्नी कामिनी शेवाळे आणि वहिनी वैशाली शेवाळे या निवडणूक रिंगणात होत्या. त्यामुळे या दोन्ही प्रभागांमध्ये जाऊबाईंचा प्रचार जोरात सुरु होता. परंतु या मतदारांनी शेवाळे यांच्या पत्नी कामिनी यांना न स्वीकारता त्यांच्या वहिनीला महापालिकेत पाठवून दिले. त्यामुळे बायको हरली आणि वहिनी जिंकली. मात्र, याबरोबरच शेवाळे यांचे लाडके शाखाप्रमुख निमेश भोसले आणि शेखर चव्हाण यांचाही पराभव झाल्यामुळे शेवाळेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या