उत्सुकता, हुरहूर आणि दिलासा...

मुंबई - नववर्षाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी काय भाषण करणार, याची हुरहूर लागली होती. विशेषतः नोटबंदीच्या निर्णयानंतर पुन्हा अशीच एखादी घोषणा होते की काय, याची भीतीयुक्त उत्सुकता निर्माण झाली होती. पण देशवासीयांना नववर्षासाठी शुभेच्छा देताना पंतप्रधानांनी लोकहिताच्या काही घोषणा करून दिलासा दिला आणि नोटाबंदीचा निर्णय देशाविकासासाठी किती महत्त्वाचा होता, हे सांगण्याची संधीही साधली.

देशात काही ठिकाणी भासलेला चलनाचा तुटवडा, सुट्टे पैसे न मिळणं याबाबत मात्र मोदींनी काहीच वक्तव्य केलं नाही.

पंतप्रधानांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे -

- नव्या वर्षाचं स्वागत उत्साहात करण्याचं आवाहन.

- भ्रष्टाचार, काळ्या पैशामुळे जनता त्रस्त झाली होती. या गुदमरण्यातून त्यांची सुटका होणं गरजेचं होतं. नोटबंदीच्या निर्णयामुळे देशात शुद्धीयज्ञ सुरू झालाय. जनता देशाच्या विकासात नक्कीच मदत करेल.

- नोटबंदीला 50 दिवस होऊन गेले. या 50 दिवसांत जनता आमच्या पाठीशी उभी राहिली. नव्या वर्षात गरीब, शेतकरी आणि सामान्यांना झालेला त्रास कमी करण्‍यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

- देशातील अनेक गरिबांकडे हक्काचं घर नाही. अशांसाठी पंतप्रधान निवास योजनेंतर्गत दोन नवीन योजनांची घोषणा. नवं घर घेण्यासाठी 9 लाखांपर्यंतच्या कर्जावर 4 टक्के तर 12 लाखांच्या कर्जावर 3 टक्क्यांची सूट.

- सरकार सज्जनांचं आहे आणि दुर्जनांना चांगल्या मार्गावर आणण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असेल.

- यापूर्वी बँकांत एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे आले नव्हते. बँकांनी कार्यपद्धती बदलत गरीब शेतकरी आणि मध्यमवर्गाला केंद्रस्थानी ठेऊन काम करावं.

पुढील बातमी
इतर बातम्या