मुंबईचा मृत्यूदर देशापेक्षा अधिक असणं चिंताजनक- देवेंद्र फडणवीस

मुंबईतील मृत्यूदर सातत्याने वाढत असल्याने काेरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. (higher mortality rate due to coronavirus is not good for mumbai says opposition leader devendra fadnavis)

आपल्या पत्रात देवेंद्र फडणवीस लिहितात की, जुलै महिन्यात मुंबईत प्रतिदिन ६५७४ चाचण्या करण्यात आल्या आणि या महिन्याचा मृत्यूदर हा ४.९१ टक्के इतका होता. आॅगस्ट महिन्यात आतापर्यंत (१७ आॅगस्ट) प्रतिदिन ७००९ चाचण्या करण्यात आल्या. या १७ दिवसांचा मृत्यूदर हा ५.४० टक्के इतका झाला आहे. मुंबईची एकूण लोकसंख्या पाहता प्रतिदिन ७ हजार चाचण्या ही संख्या अतिशय कमी आहे.

हेही वाचा - Devendra Fadnavis: रुग्णसेवा म्हणजे केवळ खाटा वाढवणं नाही- देवेंद्र फडणवीस

देशाचा मृत्यूदर आता १.९२ टक्के इतका झाला आहे. असं असताना मुंबईतील मृत्यूदर सातत्याने ५ टक्क्यांच्या वर असणं हे चिंताजनक आहे. महाराष्ट्राचा मृत्यूदर हा ५.२० टक्के इतका होता. तो जुलैत २.८९ टक्के इतका झाला. आणि आता आॅगस्टच्या १७ दिवसांत तो २.८९ टक्के इतका पुन्हा कायम आहे. आतापर्यंतच्या सर्व एकूण आकडेवारीचा विचार करता महाराष्ट्राचा मृत्यूदर हा ३.३५ टक्के इतका आहे. 

आतापर्यंतच्या आकडेवारीचा विचार करता देशातील संसर्गाचं प्रमाण हे ८.८१ टक्के इतकं असून ते महाराष्ट्रात १८.८५ टक्के, तर मुंबईत १९.७२ टक्के इतकं आहे. एकिकडे संसर्गाचं प्रमाण अधिक आणि दुसरीकडे सातत्याने वाढणारा मृत्यूदर पाहता चाचण्यांवर अधिकाधिक लक्ष केंद्रीत करणं, रुग्ण ओळखणं, त्यातून विलगीकरण आणि अन्य नागरिकांना सुरक्षित ठेवणे हा एकमात्र पर्याय उपलब्ध असल्याने मुंबईत चाचण्या वाढवण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी आपण संबंधितांना सूचना द्याव्यात, अशी मागणी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

हेही वाचा - मुंबईत दररोज फक्त ४ हजार चाचण्या, देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र 

पुढील बातमी
इतर बातम्या