देशात ज्याप्रमाणे 'नमो अॅप'मधून माहिती सार्वजनिक होत आहे, त्याप्रमाणेच राज्यातही 'महामित्र'च्या नावाखाली अनेकांची खाजगी माहिती लीक होत असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. जगभरात सोशल मीडियाची खासगी माहिती सार्वजनिक होत असल्याचा आरोप होत असतानाच राज्यातील माहिती 'अनुलोम' या खाजगी ट्रस्टकडे जमा होत असल्याचा खळबळजनक आरोप चव्हाण यांनी विधानसभेत केला.
राज्याच्या माहिती संचलनालयाने १ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 'महामित्र अॅप' सुरु केले होते. मुख्यमंत्र्यांनी या अॅपद्वारे निवडल्या गेलेल्या ३०० महामित्रांचा सत्कारही केला होता. राज्य सरकारच्या खर्चाने सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची माहितीही या अॅपमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र, हे अॅप अतुल वझे ही व्यक्ती 'अनुलोम' ट्रस्टच्या माध्यमातून चालवत आहे. या अॅपची माहिती राज्य सरकारच्या माहिती संचलनालयाकडे न राहता खासगी ट्रस्टकडे जात आहे. राज्यभरातील लाखो लोक महामित्र अॅपचा वापर करत आहेत. त्यांच्या परवानगी शिवाय खासगी ट्रस्टकडे माहिती जमा होत असल्याने ही गंभीर बाब आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
राज्य शासनाने आधुनिक युगातील वेगवान संपर्क साधनांचा विधायक कार्यासाठी उपयोग करुन घेण्यासाठी आणि तरुणांना जास्तीत जास्त संधी देऊन विवेकशील समाज घडविण्यासाठी ‘सोशल मीडिया महामित्र उपक्रम’ राबविण्याचा निर्धार केला आहे.
आधुनिक काळात सोशल मीडिया अत्यंत प्रभावी झाला आहे. बहुतांश युवक मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडिया आता मनोरंजनाचे साधन न राहता ज्ञान उपलब्ध करुन घेण्याचे प्रभावी साधन ठरले आहे. लोकांची मने आणि मते घडविण्याची ताकद सोशल मीडियामध्ये असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. देशातील बहुतांश युवक फेसबुक, व्हॉट्ॲप, इन्स्टाग्राम, ट्विटर आदींचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यामुळे शासनाने सोशल मीडियाची ताकद जाणून ‘सोशल मीडिया महामित्र’ उपक्रम राबवण्याचा ठरवले आहे.
हेही वाचा