Kharghar heatstroke tragedy: आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, 'आप'ची मागणी

महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात उष्माघाताने 15 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

यासंदर्भात खारघर पोलिसांना लेखी निवेदन देण्यात आल्याची माहिती आपचे महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदे यांनी बुधवारी दिली.

बुधवारी दुपारी ‘आप’चे पदाधिकारी उष्माघातामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची विचारपूस करण्यासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात आले होते.

यावेळी आप सचिव शिंदे यांनी आयोजकांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असून हवामान खात्याने उष्माघाताचा इशारा देऊनही सरकारने स्वतःच्या प्रसिद्धीसाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचा आरोप केला.

आम आदमी पक्षाने आरोप केला आहे की, व्हीआयपींसाठी सुविधा देण्यात आली होती आणि कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांसाठी काहीच नाही. तसेच, सरकारने 15 जणांचा मृत्यू झाल्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात 50 हून अधिक लोकांचा उष्माघात आणि चेंगराचेंगरीमुळे मृत्यू झाल्याचा अंदाज आहे, असा आरोप आप पक्षाने केला आहे.

25 लाखांच्या पुरस्कारावर 14 कोटी रुपये खर्च केल्यानंतर सरकारने असा पुरस्कार सोहळा बंद आवारात आयोजित करावा, अशी आम आदमी पार्टीची मागणी आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या