ठाण्यात राष्ट्रवादीचं वाढतं वर्चस्व राजन विचारेंना त्रासदायक ठरेल?

ठाणे मतदारसंघ हा शिवसेनेचा गड मानला जातो. काही अपवाद सोडला तर १८ वर्षे शिवसेनेचीच सत्ता होती, २००९ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजीव नाईक यांनी या जागेवरून विजय मिळवला होता. परंतु आता ही जागा पुन्हा शिवसेनेच्या ताब्यात आहे. २०१४ मध्ये शिवसेनेच्या राजन विचारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा २ लाख ८१ हजार मतांनी पराभव केला होता. यावेळीही लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने विद्यमान खासदार राजन विचारे यांनाच उमेदवारी जाहीर केली आहे. राजन विचारे यांनी सोमय्या विद्यालयातून केवळ ११ वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

राजकीय कारकिर्द

राजन विचारे हे कट्टर शिवसैनिक मानले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून ते शिवसेनेसोबतच आहेत. मध्यम वर्गातून आलेले विचारे हे १९८५ साली शिवसेनेचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करू लागले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या जवळचे ते मानले जात होते. त्यानंतर २००६ साली ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर त्यांच्याकडे महापौरपदाची धुरा सोपवण्यात आली होती. २००९ साली ते विधानसभेवरही निवडून गेले होते. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी लोकसभेत विजय मिळवत दिल्लीत स्थान मिळवलं.

संपत्ती

राजन विचारे यांच्याकडे २ कोटी रूपयांची तर त्यांच्या पत्नीकडे १ कोटी २२ लाखांची जंगम मालमत्ता आहे. तर विचारे यांच्याकडे ११ कोटी ७६ लाखांची आणि त्यांच्या पत्नीकडे २ कोटी ८२ लाखांची स्थावर मालमत्ता असल्याची माहिती त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

राष्ट्रवादीला विजयाची आशा

ठाणे लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या विधानसभेच्या मतदारसंघांपैकी ३ मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातून निसटले आहेत. त्यात सध्या ऐरोली आणि बेलापुरमध्ये सध्या राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. तर गेल्या महापालिकेच्या निवडणुकीतही सेना-भाजपच्या नगरसेवकांची संख्या वाढल्याचं दिसत आहे. त्यामुळे विचारे यांच्यासाठी ही परिस्थिती दिलासादायक आहे. तरीही त्यांच्यासमोर आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांचं आव्हान असणार आहे.

पाटणकर-विचारे आमनेसामने

ठाण्यात राजन विचारे आणि मिलिंद पाटणकर आमनेसामने असल्याचं चित्र मध्यंतरी पहायला मिळालं होते. मिलिंद पाटणकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरून शिक्षित उमेदवाराला मत देण्याचं आवाहन केलं होतं. विचारे यांचं शिक्षण ११ वी पर्यंत तर त्यांचे प्रतिस्पर्धी आनंद परांजपे यांचं शिक्षण इंजिनिअरिंग आणि एमबीएपर्यंत झालं आहे. त्यामुळे पाटणकर यांच्या फेसबुक पोस्टनंतर चर्चांना उधाण आलं होतं.

वादविवाद 

भाजपाच्या ठाण्यातील २७ नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ठाण्याची जागा आपल्या ताब्यात घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर विचारे यांनी विरोधकांवर मात करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यावेळी भाजपाच्या २ नगरसेवकांचं पद धोक्यात आलं होतं. त्यानंतर त्यातील एक नगरसेवक अशोक राऊळ यांच नगरसेवकपद रद्द करण्यात आलं होतं. या प्रकरणानंतर त्यांनी भाजपाची नाराजी ओढवून घेतली होती. भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मत न देण्याचा निर्णय घेतला होता.

#MLviews

मागील निवडणुकीत भरघोस मताधिक्क्याने राजन विचारे विजयी झाले होते. यंदाही हा मतदारसंघ त्यांच्यासाठी अनुकूल मानला जातोय. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झालेला पराभव तसंच पालिका निवडणुकीत युतीचे वाढलेले नगरसेवक यामुळे विचारे यांच्या विजयाचा मार्ग सोपा दिसत असला तरी ठाण्यात राष्ट्रवादीची ताकद लक्षात घेता उच्चशिक्षित उमेदवार आनंद परांजपे चांगली टक्कर देऊन विचारेंना घाम फोडतील हे नक्की. 


हेही वाचा - 

शिवसेनेचा गड असणाऱ्या कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंचा विजय सहजसोपा?

भिवंडीकर पुन्हा ठेवतील का कपिल पाटील यांच्यावर विश्वास?


पुढील बातमी
इतर बातम्या