रविवार संध्याकाळपासून टीव्ही चॅनेलवर सुरू असलेले एक्झिट पोल्स म्हणजे नौटंकी आहे. लोकसभा निवडणुकीचे खरे निकाल येत्या २ दिवसांत स्पष्ट होतील, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक्झिट पोलवर टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी संध्याकाळी इस्लाम जिमखान्यात रमजाननिमित्त इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना पवार म्हणाले, देशात निवडणुका झाल्या आहेत. देश कुठल्या मार्गावर जाईल, कुठल्या विचारधारेचं सरकार बनेल, हे येत्या काही दिवसांतच कळेल. परंतु कालपासून मीडियाच्या माध्यमातून वेगळं वातावरण तयार करण्यात येत आहे. कालपासून अनेकजण माझ्याशी संपर्क करून चिंता व्यक्त करत आहेत. काही मीडिया सत्ताधारी पक्षाच्या हातातील बाहुले बनले आहे. परंतु चिंता करू नये काही दिवसांतच चित्र स्पष्ट होईल.
निवडणुका होत राहतील, सरकार बनत राहील. लोकांचे प्रश्न सोडवणं हे सरकारचं काम आहे. परंतु आज ज्यांच्या हातात सरकार आहे, ते राजधानी सोडून हिमालयात जाऊन बसले आहेत, असं म्हणत पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्यानधारणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
हेही वाचा-
काँग्रेसचा विधीमंडळ नेता कोण? राहुल गांधी घेणार अंतिम निर्णय
विधानसभा निवडणुकीत मनसेचं कमबॅक, ज्योतिष संमेलनातील भाकीत