एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची उमेदवारांची पहिली यादी जाहीर

शिवसेनेने (शिंदे) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 45 नावं आहेत. मंत्री दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत यांच्यासह स्वतःचीही उमेदवारी एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे.

भाजपा व शिवसेनेने त्यांच्या उमेदवारांच्या पहिल्या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अजित पवार) 18 उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. महाविकास आघाडी मात्र या बाबतीत मागे राहिली आहे.

एकनाथ शिंदेंच्या पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी 45 उमेदवारांची घोषणा केली आहे. 

माजी मंत्री रवींद्र वायकर हे आता वायव्य मुंबईचे खासदार झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून म्हणजेच जोगेश्वरी पूर्वमधून त्यांच्या पत्नीला म्हणजेच मनिषा वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघासाठी भाजपा व शिवसेनेत (शिंदे) बरीच घासाघीस झाली.

अखेर शिंदेंनी मात्र या जागेवरील दावा सोडला नाही. त्यामुळे जागावाटपात ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटली आणि त्यांनी येथून वायकरांच्या पत्नीला विधानसभेच्या रिंगणात उतरवलं आहे.

पक्षाने अनेक मतदारसंघांमध्ये नव्या व तरुण उमेदवारांऐवजी प्रस्थापित नेत्यांच्या नातेवाईकांना विधानसभेचं तिकीट दिलं आहे. एरंडोल, दर्यापूर, पैठण, जोगेश्वरी पूर्व, राजापूर व खानापूर मतदारसंघातून प्रस्थापित नेत्यांचे नातेवाईक निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसघातून शिवसेना (शिंदे) नेते आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, एरंडोलमधूल अमोल चिमणराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी मंत्री संदीपान भुमरे हे आता छत्रपती संभाजीनगरचे (औरंगाबाद) खासदार झाले आहेत. त्यामुळे त्यांचा बालेकिल्ला असलेल्या पैठण विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या मुलाला म्हणजेच विलास भुमरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. सांगलीच्या खानापूरमधून अनिल बाबर यांचे पूत्र सुहास बाबर यांना विधानसभेचं तिकीट देण्यात आलं आहे.


हेही वाचा

राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात

उमेदवारीवरून राजकीय पक्षांतर्गत तू-तू, मै-मै

पुढील बातमी
इतर बातम्या