Ganesh Festival 2020: गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात चेकपोस्ट तयार, दीड लाख लोकं येण्याची शक्यता

आरोग्याचं कुठलंही विघ्न येऊ न देता गणेशोत्सव सुरक्षितरित्या पार पडण्यासाठी कोकणातल्या गावोगावच्या दक्षता समित्या, गणेश मंडळ यांच्याकडून प्रशासनाला मोठं सहकार्य अपेक्षित आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडून कोरोनाच्या उपाययोजनांचा आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली. (maharashtra cm uddhav thackeray held a meeting over ganesh festival in konkan)

गणेशोत्सवात मुंबई भागातून काही लाख नागरिक विशेषत: रत्नागिरी, सिंधुदुर्गात आपापल्या घरी जाऊन गणेशोत्सव साजरा करतात. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाने मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. त्यांचं सर्वांकडून कटाक्षाने पालन झालं पाहिजे. आयसोलेशन बेड्स, इतर वैद्यकीय सुविधा तातडीने वाढवाव्यात, पुरेशा रुग्णवाहिका ठेवाव्यात, जेणेकरून गणेशोत्सवापर्यंत वैद्यकीय तयारी राहील. गावोगावच्या दक्षता समित्यांनी या काळात सर्व गावकरी कोरोना संदर्भातील सर्व नियमांचं, स्वच्छतेचे पालन करताहेत का ते नियमित पाहावं तसंच जनजागृतीही करावी, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

प्रयोगशाळा सुरु होणार

रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी यावेळी सांगितलं की, सध्या ३५०० रुग्ण उपचार घेत असून १९०० नागरिक घरीच विलगीकरणात आहेत. मागील काही दिवसांत दक्षिण रायगड भागात कोरोनाचे प्रमाण वाढले आहेत. अनेक रुग्ण औद्योगिक कामगारांमध्ये आढळले आहेत.  पनवेल, महाड मध्ये अशीच परिस्थिती आहे. १० बिल्डींग विलगीकरण करण्यासाठी अधिग्रहित केली असून ५५०० आयसोलेशन बेड्स उपलब्ध करीत आहोत.  प्रत्येक तहसीलमध्ये २०० बेड्सची कोविड सेंटरची सुविधा केली असून खासगी कंपन्यांना देखील विनंती केली आहे. ३५० बेड्ससाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालय तसंच १५० बेड्ससाठी  डीवायपाटील रुग्णालय  यांच्याशी करार केले आहेत. जिल्ह्याला अजून १५ व्हेंटीलेटर्स मिळाले आहेत. १५ ऑगस्टपूर्वी एक प्रयोगशाळा रायगड जिल्ह्यासाठी उभी करणार असून सध्या १ हजार ते १२०० चाचण्या दिवसाला होतात ते ३ हजार पर्यंत नेणार आहोत. 

हेही वाचा - Ganesh Festival 2020: गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना विरोध नाही

ग्राम कृती दल

रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, १०४९ पैकी ६६५ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. एकूण ३६ मृत्यू आजवर झाले आहेत. १४९६ बेड्सची सुविधा केली आहे. २०० रुग्ण सध्या याठिकाणी दाखल आहेत. १०० बेड्सचे महिला रुग्णालय लवकरच सुरु होणार आहे त्याचप्रमाणे रत्नागिरी प्रयोगशाळेत २०० चाचण्या होतात अशी माहितीही त्यांनी दिली. रत्नागिरीत प्रत्येक गावांत ग्राम कृती दल, नागरी कृती दल स्थापन केले आहेत तसंच जिल्ह्याच्या टास्क फोर्सच्या तीन बैठका झाल्या आहेत असंही ते म्हणाले 

सिंधुदुर्गात चेक पोस्ट सज्ज 

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं की जिल्ह्यात सध्या २७० रुग्ण असून २७ जणांवर उपचार सुरु आहेत तर ५ मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यात टास्क फोर्स काम करीत असून ३२ सार्वजनिक गणेश मंडळांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. शांतता कमिटीच्या बैठका झाल्या असून मुंबई सीमेलगत व इतर ठिकाणीही चेक पोस्ट तयार झाले आहेत. दीड लाख लोक जिल्ह्यात येण्याची अपेक्षा आहे अशीही माहिती त्यांनी दिली. 

हेही वाचा - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी बस सोडा- राजू पाटील

पुढील बातमी
इतर बातम्या