महाराष्ट्रातली 'महामुलाखत'! 'मुंबई लाइव्ह'वर

  • मुंबई लाइव्ह टीम & मुंबई लाइव्ह नेटवर्क
  • सत्ताकारण

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आजपर्यंत कैक मुलाखती झाल्या असतील, पण पुण्याच्या बीएमसीसी काॅलेजच्या मैदानावर रंगणाऱ्या मुलाखतींची सर त्यांना नक्कीच नसेल. कारण या मैदानावर रंगत आहे, एक अनोखी राजकीय जुगलबंदी. त्याच्या एका बाजूला आहेत राजकीय आखाड्यातील ‘कसलेले पहिलवान’ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तर दुसऱ्या बाजूला भल्याभल्यांना आपल्या राजकीय कैचीत अलगदरित्या पकडणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे.  

जागतिक मराठी अकादमी आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ या संमेलनात राज आपल्या ठाकरी शैलीत पवार यांची मुलाखत घेत आहेत. पवार यांच्या राजकीय कारकीर्दीला अमृतमहोत्सवी वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ज्येष्ठ हास्यकवी रामदास फुटाणे यांच्या माध्यमातून या मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं आहे. ही मुलाखत तुम्हाला 'मुंबई लाइव्ह'वर लाइव्ह बघता येईल.

काय असणार मुलाखतीत?

या मुलाखतीत विचारण्यात येणाऱ्या कुठल्याही प्रश्नांची कल्पना पवार यांना देण्यात येणार नसून राज आयत्या क्षणी त्यांना पेचात टाकणार आहेत. हेच या मुलाखतीचं प्रमुख वैशिष्ट्य असेल. राजकारणापासून समाजकारणापर्यंत एवढंच नव्हे, तर 'खासगी'तील प्रश्न विचारून राज ठाकरे मुरब्बी पवार यांना ‘बोलतं’ करतील का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

आडवळणाचा शोध घेण्याचा प्रयत्न

यांत त्यांचा राजकारणातील प्रवेश असो, पुलोदच्या वाटाघाटी असोत, काँग्रेसमधून बाहेर पडणं, पंतप्रधानपद न मिळाल्याची रूखरूख ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे संबंध अशा सर्व राजकीय आडवळणाचा शोध घेण्याचा प्रयत्न होणार आहे. काका पुतणे संबंध सोबतच समाजकारण, सिनेमा, साहित्यिकांसोबतचे संबंध, क्रिकेटच्या मैदानातील आयसीसीच्या अध्यपदापर्यंतची वाटचाल, काका-पुतण्या संबंध, सुप्रिया सुळेंच्या माध्यमातून पुढे जाणारा राजकीय वारसा, राष्ट्रवादीचं भवितव्य, अशा सर्व प्रश्नांचा यांत समावेश असणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या