मराठी माणसाला जातीपातीच्या भांडणात अडकवून महाराष्ट्रातील जमिनी बळकवण्याचा भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कुटील डाव आहे. मुंबई महाराष्ट्राच्या ताब्यात आली ही जुनी सल अजूनही गुजरातच्या मनात कायम आहे. कारण याच १ मे ला मुंबई त्यांच्या हातून निसटली होती. म्हणूनच बुलेट ट्रेन आणि मुंबई - बडोदा एक्सप्रेस वे च्या माध्यमातून पद्धतशीरपणे मुंबईवर ताबा मिळवण्याचा त्यांचा खटाटोप सुरु आहे. पण तुम्ही कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपल्या जमिनी परप्रांतीयना विकू नका. चिमाजी आप्पा सारखं शौर्य दाखवून जबरदस्तीने टाकलेले रूळ उखडून टाका, असं भावनिक आवाहन करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली.
१ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त वसईतल्या जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेच्या माध्यमातून राज यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्यालाही सुरुवात केली. पुढच्या काही दिवसांत अख्खा महाराष्ट्र पिंजून काढत मजबूत पक्ष बांधणी करणार असल्याचं ते म्हणाले.
मराठी माणसाला जातीपातीत अडकवायचं
हिंदुत्वाच्या नावावर राज्यात शिवरायांचे विचार मारले जात आहेत. पूर्वी एकमेकांशी बंधुभावाने वागणारा मराठी माणूस आज प्रत्येकाकडे जातीच्या चष्म्यातून बघतोय. तुम्ही कुठले? म्हणत पाहिलं आडनाव विचारतोय. एकाएकी हे विचार कसे बदलले? तर त्यामागे पद्धतशीर डाव आहे. मराठी माणसाला जातीपातीच्या भांडणात अडकवून ठेवायचं आणि इथल्या जमिनी ताब्यात घ्यायच्या. आपलीच माणसं चिरीमिरीसाठी जागा विकताहेत. पण जमिनी विकल्यानंतर तुम्ही जाणार कुठं? पुढच्या पिढीला काय देणार याचा विचार केलाय का? असा प्रश्न राज यांनी विचारला.
आज जो तो उठतोय आरक्षण मागतोय. पण सध्या ९५ टक्के नोकऱ्या खासगी क्षेत्रात आहेत. तर सरकार सरकारी नोकऱ्यांची संख्या कमी करत आहे. दुसऱ्या बाजूला मराठी, सरकारी शाळा, कॉलेज बंद करून खाजगी शाळा कॉलेज उघडले जात आहेत. मग आरक्षणाचा नेमका फायदा काय? फक्त भेदभावासाठी? कर्नाटक , गुजरातमध्ये कुठलीही कंपनी सुरु करायची असल्यास तिथं नोकरीत ८५ टक्के स्थानिकांना आरक्षण आहे, पण आपल्याकडं आपल्याकडं सरकारी, खाजगी नोकऱ्या कधी निघतात हे मराठी तरुणांना कळतंच नाही. मात्र या नोकऱ्या परप्रांतीयांना सहज मिळतात.
नाणारची जमीन गुजरात्यांच्या ताब्यात
नाणारला कुठला प्रकल्प येणार हे माहीत नसताना इथल्या जमिनी गुजरात्यांनी कशा काय घेतल्या? असा प्रश्न विचारत राज यांनी शहा, मोदी, सोलंकी, केडीया अशी जमीन मालकांची नावंही वाचून दाखवली.
हाच प्रकार वसई, पालघर मध्येही बुलेट ट्रेन साठी सुरु आहे. हळूहळू करत गुजरात मुंबईला जोडून टाकायचं, इथं आपली माणसं घुसवायची आणि मुंबईवर ताबा मिळवायचा. हे तुम्ही कसं सहन करता? पालघरमध्ये गुजराती पाट्या लागतात, गुजरातमध्ये मराठी पाट्या लागल्यावर त्यांना चालेल का? तुम्ही भेंडीच्या भाजीसारखे बुळबुळीत कसे झालात? कुठे गेला मर्द मराठा? हा अन्याय मोडीत काढा, असं म्हणत राज यांनी मराठी माणसाला चेतवण्याचा प्रयत्न केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना राज यांनी राज्यात कायदा सुव्यव्यवस्थेची वाट लागल्याचं सांगितलं. राज्यातल्या माता भगिनींना सध्या रस्त्यावरून चालयलाही भीती वाटते. ही स्थिती परप्रांतीयांनी केली. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोंढे येऊन ते मुंबई, ठाण्यात दाखल होत आहेत. हेच लोक दंगली करतात. राज्यात बांग्लादेशी, पाकिस्तानी मुस्लिमांचे मोहल्ले तयार होताहेत, पण मुख्यमंत्र्यांचं तिकडं लक्ष नाहीय. जेव्हा पोलिस दलातील भगिणींवर हल्ला झाला तेव्हा, सगळ्यात पहिला मोर्चा मनसे ने काढला होता. तेव्हा दंगलखोर मुस्लिमांच्या मनात धाक निर्माण झाला. फडणवीस स्वतःच्या कर्तृत्वाने मुख्यमंत्री झालेले नाही, तर आणून बसवलेले मुख्यमंत्री आहेत. वरून जे सांगितलं जातं तेवढंच ते करतात.
खोटारडे पंतप्रधान
पंतप्रधान मोदी फक्त गुुुजरातचे पंतप्रधान आहेत, त्यांच्या हाती राजीव गांधी नंतर ३० वर्षांनी बहुमताचं सरकार आलेलं असताना ते खोटं का बोलतात हेच कळत नाही. ४ लाख संडास बांधून महाराष्ट्र हागणदारीमुक्त केलं, असं म्हणतात. इथं राज्यात प्यायला पाणी नाही मग धुवायचं कशानं, मातीनं? इस्त्रोचा रिपोर्ट आहे की पाण्यावाचून महाराष्ट्रातील ४४.४ टक्के जमिनीचं वळवंटीकरण होतंय, आणि ते म्हणतात राज्यात १ लाख २० हजार विहिरी बांधल्या. कदाचित त्यांनी रस्त्यावरचे खड्डे पण मोजलेत विहिरी म्हणून, असं म्हणत त्यांना खडेबोल सुनावले.
हेही वाचा-
नाणारवरून जनतेला 'उल्लू बनाविंग'?
नाणारवरून सेना-भाजपमध्ये खडाजंगी