मनसेचा आज १३ वा वर्धापन दिन, राज ठाकरेंच्या भाषणाकडं सर्वांचं लक्ष

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शनिवारी १३ वा वर्धापन दिन आहे. ९ मार्च २००६ रोजी राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली होती. १३ व्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे मनसेच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. शनिवारी सायंकाळी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात राज ठाकरे काय बोलणार याकडं कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे. यावेळी राज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका करण्याची शक्यता आहे. 

'राज'कीय सर्जिकल स्ट्राईक

आगामी लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लढवण्याची तयारी मनसेने सुरू केली आहे. मनसेने याअगोदर ९ मार्चला ''राजकीय सर्जिकल स्ट्राईक'' अशा आशयाचे पोस्टर्स मुंबईभर लावले आहेत. तसंच ''सर्जिकल स्ट्राईक''साठी तयार राहण्याचं आवाहनही मनसैनिकांना पक्षाकडून करण्यात आलं आहे. या पोस्टर्समुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुणाला टार्गेट करणार? अन् कुणाची दाणादाण उडवणार याची उत्सुकता ताणली गेलीय.

अशोक चव्हाणांचा विरोध

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत मनसे सहभागी होणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. राष्ट्रवादीच्या कोट्यातून एक जागा घेऊन मनसे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र,  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मनसेशी वैचारिक मतभेद असल्याचे सांगत त्यांना महाआघाडीत घेणार नसल्याचं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे शनिवारी काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे. 


हेही वाचा -

‘या’ दिवशी राहणार पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग बंद

चंद्रकांत पाटीलही जुमलेबाज- नवाब मलिक


पुढील बातमी
इतर बातम्या