“शिवसेनेला ‘मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर’ हा रोग झाला असावा कारण कधी ते सत्तेत असतात, तर कधी विरोधात असतात”, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
शिवसेनेने बुधवारी सकाळी वांद्रे-कुर्ला संकुलातील पीक विमा कंपन्यांविरोधात मोर्चा काढला होता. या मोर्चाचं नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं. या मोर्चात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार-खासदार पदाधिकारी आणि शेकडो शिवसैनिक सहभागी झाली होते.
या मोर्चानंतर केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले की, हा मोर्चा सरकारविरोधातील नसून विमा कंपन्यांविरोधातील आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊनही राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळालेली नाही. त्याला जबाबदार असलेल्या विमा कंपन्यांनी येत्या १५ दिवसांत शेतकऱ्यांचे सर्व दावे निकाली काढावेत. कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांची नावं जिल्ह्यातील शिवसैनिकांनी बँकाकडून मागवून घ्यावीत. तसं नाही, झालं तर आता शांततेत काढलेला मोर्चा १५ दिवसांनंतर बोलायला लागेल.
ज्या सरकारने शेतकऱ्यांना पिक विमा देण्यासाठी विमा कंपनीची नेमणूक केली, त्या सरकारमध्ये शिवसेना बरोबरीची वाटेकरी आहे. असं असताना शिवसेनेने रस्त्यावर उतरून काढलेल्या मोर्चावर सर्व स्तरातून टीका झाली. ही निवडणुकीआधीची स्टंटबाजी असल्याचं म्हटलं जात आहे. त्यावर बोलताना शेतकरी नेते राजू शेट्टी यांनीही शेतकऱ्यांवर ही वेळ येईपर्यंत शिवसेना झोपली होती का? ही सर्व नौटंकी आहे, अशी टीका केली.
त्यावर शिवसेनेला मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा रोग झाला असावा, अशी शंका नोंदवत देशपांडे यांनी शिवसेनेच्या आंदोलनाला लक्ष्य केलं आहे.
हेही वाचा-
१५ दिवसांत कर्जमाफीची प्रकरणं निकाली काढा, उद्धव ठाकरेंचं विमा कंपन्यांना अल्टिमेटम
चंद्रकांत पाटील भाजपा प्रदेशाध्यक्षपदी, मंगल प्रभात लोढा बनले मुंबई अध्यक्ष