शिशिर शिंदे ‘राज’कारण सोडणार?

चैत्रचाहूल लागल्यानंतर शिशिर ऋतुने निरोप घेतला असला तरीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पानझड थांबायला तयार नाही. मनसेचे नेता शिशिर शिंदे यांनी आपल्याला नेतापदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं, अशी विनंती करणारं पत्र पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लिहिलं आहे. आपण मनसेला ‘जय महाराष्ट्र’ करणार असल्याचं शिशिर शिंदे यांनी पत्रात कुठेही लिहिलेलं नाही. यासंदर्भात ‘मुंबई लाइव्ह’ने शिशिर शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता आपण नाराज असल्याचं त्यांनी लपवलं नाही. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आपलं भांडुप परिसरातले उमेदवार ठरवताना राज ठाकरे यांनी विश्वासात न घेतल्याने दुखावले गेल्याचं त्यांनी मान्य केलं. कार्यक्षेत्र असलेल्या वॉर्डांमधल्या पाचही उमेदवारांना अनामत रक्कम गमवावी लागते, ही आपल्यासाठी लाजिरवाणी बाब आहे, अशा शब्दांत त्यांनी आपली भावना व्यक्त केली. “सध्या मी माझ्या आवडत्या कामात स्वतःचं मन रमवतोय. वृक्षसंवर्धनाचं काम मी जोमात करतोय. वेगवेगळ्या पद्धतीच्या वृक्षांची लागवड करण्यातून मिळणारा आनंद मी सध्या अनुभवतोय. मला नेतापदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी विनंती मी पक्षाध्यक्षांना आधीच केली आहे. विश्वास ठेवा. मी कोणत्याही पक्षाच्या संपर्कात नाही. मी सध्या आहे त्या स्थितीत समाधानी आहे.“ आपल्या विधानात राजकारणाबाबत जास्तीत जास्त अलिप्तता डोकावावी, याची काळजी घेत शिशिर शिंदे यांनी स्वतः लिहिलेल्या पत्राविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मनसेच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात अलीकडे शिशिर शिंदे यांची अनुपस्थिती ठळकपणे जाणवत होती. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीकाळी ‘माझा लाडका शिवसैनिक’ म्हणून गौरवलेले शिशिर शिंदे बाळासाहेबांच्या हयातीतच आपल्या ‘राजा’ला साथ देत मनसेत दाखल झाले होते. राज यांनी पक्षाच्या नव्या रचनेत त्यांना नेतापदही बहाल केलं. गेले काही दिवस डावललं गेल्याची भावना त्यांच्या मनात घर करून असल्याची माहिती त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्याने दिली आहे. या भावनेतूनच मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आधीच राज ठाकरे यांना त्यांनी पत्र लिहिलं होतं. सध्या मुलगा अमित ठाकरे याच्या प्रकृतीअस्वास्थ्यामुळे राज ठाकरे यांची असलेली मनःस्थिती मी समजू शकतो. त्यामुळे कोणताही विषय ताणण्याची आपली इच्छा नसल्याचंही शिशिर शिंदे यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या