मनसे कार्यकर्ते आक्रमक, भोंगे लावत हनुमान चालिसाचं पठन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्त्यांनी भोंग्याविरोधात आंदोलन सुरू केले आहे. सकाळी मशिदींसमोर हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले.

मुंबईतील अनेक भागात मशिदींसमोर मनसेनं हनुमान चालिसाचे पठण केले. चारकोप, चांदिवली, मुंबादेवी, ठाणे आदी भागात मनसे कार्यकर्त्यांनी सकाळी हनुमान चालीसा वाजवली. पोलिस अनेक ठिकाणाहून मनसे कार्यकर्त्यांना अटक करत आहेत.

बुधवार सकाळी झालेल्या अजानच्या निषेधार्थ ठाण्यात लाऊडस्पीकरवर मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसाचं पठण केलं. ठाण्यातील इंदिरा नगर इथल्या मशिदीत पहाटे ५.१४ वाजता अजान झाली. याच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्ता पप्पू कदम यांनी त्याच मशिदीजवळील इंदिरा डोंगरा येथील महालक्ष्मी मंदिरात हनुमान चालीसाचा पाठ सुरू केला.

कल्याण डोंबिवलीतील ५० हून अधिक कार्यकर्त्यांना नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. पोलिसांनी काल रात्री २० ते २५ मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना अटक केली.

मंगळवार रात्रीपासून मशीद-मंदिर परिसरात पोलिसांची गस्त सुरू आहे. कल्याण परिसरातील मशिदींमध्ये सकाळची नमाज अदा करण्यात आली. अजानसाठी लाऊडस्पीकर लावण्यात आले नव्हते. त्याचबरोबर नवी मुंबईतील ऐरोलीजवळील जामा मशिदीसमोर हनुमान चालिसाचे पठण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हनुमान चालिसा पठण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

औरंगाबादमधील ४८ मशिदींबाहेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. संवेदनशील ठिकाणी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. रात्रीपासून पोलीस सतर्क आहेत. मुंबईत प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे.


हेही वाचा

कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करणार - महाराष्ट्राचे डीजीपी रजनीश सेठ

राज ठाकरेंवर औरंगाबादेत गुन्हा दाखल, १२ अटींचे केले उल्लंघन

पुढील बातमी
इतर बातम्या