‘एमपीएससी’च्या ३ रिक्त पदांवरील नियुक्तीची अधिसूचना जारी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या ३ रिक्त पदांवरील नियुक्तीस राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मान्यता दिल्यानुसार ३ सदस्यांच्या नेमणुकीच्या अधिसूचना जारी करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या रिक्त पदांवरील नियुक्तीला मान्यता देण्याबाबत काल सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली होती.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी डॉ. देवानंद बाबुराव शिंदे, डॉ. प्रताप रामचंद्र दिघावकर आणि राजीव रणजीत जाधव यांची या अधिसूचनेनुसार नियुक्ती करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना दत्तात्रय भरणे म्हणाले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी पोलीस उपनिरीक्षक परीक्षा (४९६ पदे), महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा (१ हजार १४५ पदे), महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा परीक्षा (४३५ पदे), महाराष्ट्र वनसेवा परीक्षा (१०० पदे), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा (१६ पदे) याप्रमाणे एकूण २ हजार १९२ पदांसाठी एकूण ६ हजार ९९८ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र झालेले आहेत. 

हेही वाचा- “राज्यापाल असल्याचा त्यांना विसर पडलाय का”, नवाब मलिकांनी भगतसिंह कोश्यारींना सुनावलं

त्यापैकी ३७७ उमेदवारांच्या मुलाखती झाल्या असून उर्वरित ६ हजार ६२१ उमेदवारांच्या मुलाखती होणे बाकी आहे. आता या सदस्य नियुक्तीमुळे या भरती प्रक्रियेला वेग येणार असून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.

सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्राच्या लोकसेवा आयोगाची सदस्य संख्या वाढवण्याच्या अनुषंगानेही राज्यपाल कोश्यारी यांच्यासमवेत बैठकीत चर्चा झाली आहे. आयोगाच्या एका सदस्यांचा कार्यकाल लवकरच पूर्ण होत असून त्यांची रिक्त होणारी जागा भरण्यासाठीही लवकरच प्रस्ताव पाठवण्यात येईल, असं राज्यपालांना सांगितलं. हे दोन्ही प्रस्ताव प्राप्त झाल्यावर त्यावर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असंही राज्यपाल म्हणाल्याचं भरणे यांनी सांगितलं.

दरम्यान या तीन सदस्यांच्या नियुक्तीवरून महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपालांमध्ये थोडीफार चकमक उडाली होती.

हेही वाचा- एमपीएससी सदस्य नियुक्तीची फाईल सोमवारीच मिळाली, राजभवनकडून खुलासा
पुढील बातमी
इतर बातम्या