काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलाचे संकेत, प्रदेशाध्यक्षपद नाना पटोलेंकडे?

सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस सहभागी असली, तरी सरकारच्या निर्णयप्रक्रियेत काँग्रेसला विचारात घेतलं जात नसल्याचं वक्तव्य अलिकडेच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं होतं. यामुळे एका बाजूला महाविकास आघाडी सरकारमधील  (maha vikas aghadi government)मित्रपक्षांमध्ये सुसंवाद नसल्याचं पुढं आलं होतं. तर दुसऱ्या बाजूला आपली भूमिका ठामपणे मांडण्यात सरकारमध्ये सामील काँग्रेसचे मंत्रीही कमी पडत असल्याचं म्हटलं जाऊ लागलं. यावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेसच्या राज्यस्तरीय नेतृत्वात (leadership changes in maharashtra congress) फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. 

हेही वाचा - महाराष्ट्रात काँग्रेस डिसिजन मेकर नाही- राहुल गांधी

महत्त्वाची खाती तरी

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापना करताना विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांच्या संख्येनुसार मंत्रीपद देण्याचा फाॅर्म्युला ठरवण्यात आला होता. त्यानुसार काँग्रेसच्या वाट्याला महसूल, सार्वजनिक बांधकाम, उर्जा, शालेय शिक्षण, महिला व बालकल्याण,मदत व पुनवर्सन, आदिवासी विकास, वस्त्रोद्योग आणि मस्य व बंदरे विकास, अशी महत्त्वाची खाती आली. कोरोना संकट आणि लाॅकडाऊनच्या काळात शिवसेना तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांकडे असलेल्या खात्यांपैकी प्रत्येकजण आपापल्या खात्यामार्फत जनसामान्यांवर ठसा उमटवत असताना काँग्रेस पक्ष मागे राहात असल्याचं पक्षप्रमुखांना वाटत आहे. सरकार म्हणून कोरोना आणि लाॅकडाऊनबाबतचे निर्णय घेताना काँग्रेसची कुठलीही छाप दिसून येत नसल्याचंही त्यांना वाटत आहे. 

असे होतील फेरबदल

बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल विभागासोबतच प्रदेशाध्यक्षपदाचीही जबाबदारी आहे. नाना पटोले आक्रमक स्वभावासाठी ओळखले जात असले, तरी त्यांच्यावर सध्या विधासनभा अध्यक्षपदाची जबाबदारी आहे, तर पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा अभ्यासू नेते मंत्रिमंडळाच्या बाहेर बसून आहे. अशा स्थितीत पक्ष संघटनेत बदल करून प्रदेशाध्यक्षपद नाना पटोले यांच्याकडे सोपवून रिक्त होणाऱ्या विधानसभाध्यक्ष पदावर चव्हाण यांना बसवण्याचा विचार काँग्रेसश्रेष्ठी करत असल्याचं कळत आहे. पटोले यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद गेल्यास पक्ष संघटनेत नवी उर्जा येईल, असा मतप्रवाह आहे. 

यासंबंधातील निर्णय लवकरच अपेक्षित असल्याचं म्हटलं जात आहे. 

हेही वाचा - राहुल-उद्धव यांच्यात ‘फोन पे चर्चा’, एकमेकांना दिलं 'हे' आश्वासन...
पुढील बातमी
इतर बातम्या