राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असल्याने कुठल्या पक्षाकडून कोण उमेदवारी भरणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. दुपारी ३ वाजता अर्ज भरण्याची मुदत संपणार आहे. त्यानुसार सोमवारी काँग्रेसकडून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी तसंच भाजपाकडून अनपेक्षितरित्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी अर्ज भरला. राज्यसभेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून प्रत्येकी एक तर, भाजपाकडून ४ नावांची घोषणा झाली आहे. एकूण ६ जागांवर ७ उमेदवारांनी अर्ज भरण्यात आल्याने ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचं दिसत आहे.
सोमवारी राज्यसभेसाठी अर्ज भरण्याची शेवटचा दिवस असताना दुपारी बाराच्या सुमारास काँग्रेसच्या तिकीटावर ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी अर्ज भरला. अर्ज भरताना ते आपल्या पत्नीसहित उपस्थित होते. तर सोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार इ. उपस्थित होते.
त्याचप्रमाणे भाजपाच्या तिकीटावर नारायण राणे आणि केरळ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व्ही. मुरलीधर यांनीही आपले उमेदवारी अर्ज भरले. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरिष बापट उपस्थित होते.
याअगोदर भाजपाकडून प्रकाश जावडेकर, तर राष्ट्रवादीकडून वंदना देसाई आणि शिवसेनेकडून अनिल देसाई यांनी आपापले उमेदवारी अर्ज भरले आहेत. राज्यातील एकूण ६ जागांपैकी संख्याबळानुसार भाजपाचे ३ उमेदवार, तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो.
रहाटकर यांनी ऐनवेळी माघार घेतल्यास सर्वच उमेदवारांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. पण, तसं न झाल्यास ही निवडणूक चुरशीची होऊ शकते.