शिवस्मारक भूमिपूजनाचा घाट कशासाठी? - अजित पवार

जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मुख्यमंत्री हजर नसताना शिवस्मारकाचं भूमिपूजन करण्याची काय गरज होती? शिवसंग्राम संघटनेचे नेते आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी स्वत: चं महत्त्व वाढवण्यासाठी हा भूमीपूजनाचा घाट घातला होता का? असा प्रश्न उपस्थित करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेटे यांनी दुर्घटनेप्रकरणी लक्ष्य केलं आहे.मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी हे प्रश्न उपस्थित केले आहेत.

अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला जाणारी स्पीड बोट दगडावर आपटून झालेल्या अपघातात चार्टर्ड अकाउंटंट सिद्धेश पवार (३६) या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. परंतु, दुसरी बोट वेळीच आल्याने सुदैवाने बोटीवरील २४ जणांचे प्राण वाचले. या दुर्घटनेतंर शिवस्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम राज्य सरकारने आयोजित केला होता की मेटे यांनी स्वत: शिवस्मारक समितीच्या माध्यमातून या कार्यक्रमाची आखणी केली होती, यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

या अपघातानंतर विरोधी पक्षांनी मेटे यांना लक्ष्य केलं आहे. या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीसोबतच अपघाताला जबाबदार असणाऱ्या सर्वांविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणीही विरोधकांनी केली आहे.


हेही वाचा- 

शिवस्मारक बोट अपघात: फास्ट ट्रॅकवर चौकशी होणार- केसरकर

शिवस्मारक बोट अपघाताची चौकशी होणार, मृताच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत - मुख्यमंत्री


पुढील बातमी
इतर बातम्या