राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी २ दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षात विलीन होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. मात्र, कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलं. लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची शनिवारी मुंबईत बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादीचं स्वतंत्र अस्तित्व असून विलिनीकरणाचा प्रश्नच येत नसल्याचा सूर सर्व नेत्यांनी लावला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण न करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व नेते, नवनिर्वाचित खासदार, उमेदवार, पदाधिकारी आणि सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. 'कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस इतर कोणत्याही पक्षात विलीन होणार नसून, पक्षाचं स्वतःचं एक अस्तित्व आहे, हे अस्तित्व पक्ष कायम ठेवणार. कार्यकर्त्यांनी अफवांन बळी पडता कामा नये’, असं आवाहन राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केलं.
त्याशिवाय, 'जनता लोकसभेला वेगळा विचार करते, तर विधानसभेला देखील वेगळा विचार करते. महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुकीत लोक वेगळा विचार करतील आणि या सरकारला खाली खेचतील. पराभव हा पराभव असतो. पण त्यानं खचून जायचं नसतं, तर पुन्हा लढायचं असतं, असं आवाहन देखील अजित पवार यांनी केलं.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार नसल्याचं स्पष्ट केलं. तसेच राष्ट्रवादीतील नेतृत्व बदलावर कोणतीही चर्चा करण्यात आली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच, या बैठकीमध्ये शरद पवार यांनी पक्षाच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना विधानसभेच्या कामाला लागण्याचं आदेश दिल्याचं पाटील यांनी म्हटलं.
विधानसभा निवडणूक अवघ्या १०० दिवसांवर आली आहे. त्यामुळं सर्व नेते प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन दौरा करतील. त्याशिवाय दुष्काळाची देखील पाहणी करण्यात येणार आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच विधानसभेचा उमेदवार ठरविण्यात येणार आहे. तसेच तरुणांना, महिलांना आणि नव्या चेहऱ्यांना या निवडणुकीत संधी देण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा -
व्हॉट्सअॅपमुळं सापडला अडीच वर्षांपूर्वी हरवलेला शुभम
पुनाळेकर, भावेच्या कोठडीत ४ जूनपर्यंत वाढ