पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची नवी खेळी ?

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आघाडी होणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी राष्ट्रवादी एका नव्या खेळीच्या तयारीत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. समविचारी शेकाप, कम्यूनिस्ट आणि समाजवादी पक्षासोबत आघाडी करण्याचा राष्ट्रवादीचा मानस असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. आघाडी संदर्भात काँग्रेसच्या प्रस्तावाची वाट राष्ट्रवादी पाहत आहे. एका ठराविक काळापर्यंत काँग्रेसच्या प्रस्तावाची वाट पाहण्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे. मात्र हे जरी खरे असले तरी राष्ट्रवादीने पालिका निवडणुकीसाठी वेग पकडलाय. राष्ट्रवादीकडून इच्छुकांना उमेदवारी अर्जाचे वितरण सुरू असून, आतापर्यंत 450 अर्जांचे वितरण झाल्याची माहिती पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिली. 19 नोव्हेंबरपर्यंत अर्जाचे वितरण सुरू राहणार असून, त्यानंतर 23 ते 30 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. दरम्यान काँग्रेस आघाडीबाबत सचिन अहिर यांना विचारले असता त्यांनीही एकला चलो रे चे संकेत दिलेत. काँग्रेसकडून येत्या काही दिवसांत प्रस्ताव आला तर ठिक, नाही तर राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढेल, असे अहिर यांनी स्पष्ट केले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या