'ज्यांचे चिन्ह हात, तेच अदृश्य हाताची चर्चा करतात' धनंजय मुंडेंचा टोला

'ज्यांचे चिन्ह हात आहे, तेच अदृश्य हातांची चर्चा करतात', असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धंनजय मुंडे यांनी काँग्रेसला लगावला. सुयोग येथे पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना धंनजय मुंडे यांनी हे विधान केलं. विधान परिषदेत प्रसाद लाड यांना अदृश्य हातांनी मदत केली त्याबद्दल बोलताना धंनजय मुंडे यांनी 'हे पहिल्यांदा झाले नसून, याआधी देखील असे क्रॉस मतदान झालेत. यावेळी फक्त आमची मतं फुटली असं म्हणता येणार नाही', असंही मुंडे यांनी यावेळी सांगितलं.

मुंडेंचे आघाडीचे संकेत

'मागील विधानसभा निवडणुकीत आम्ही वेगवेगळे लढलो होतो. त्यामुळे फटका बसला मात्र आताचं वातावरण पाहता आम्ही समविचारी पक्ष एकत्र येऊन विचार करू आणि योग्य निर्णय घेऊ', असं मुंडे यांनी यावेळी सांगत आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडीचे संकेत दिले. गुजरातचे निकाल पाहून राज्य सरकार अस्वस्थ झाल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. या सरकारची वापरायची सगळी कार्ड संपलेली असून, आता लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुका हे सरकार लावेल, असं सांगत 'मुख्यमंत्र्यांनी आमचं बघण्यापेक्षा स्वतःचं बघावं कारण आमचं सगळं जुळत आलं आहे. तशा चर्चा देखील सुरू झाल्या आहेत. आमच्या आणि काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी एकत्रित येण्याबाबत प्रस्ताव दिल्याची' माहिती मुंडे यांनी यावेळी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या