वृत्तपत्र विक्रेता बनले सुधार समिती अध्यक्ष

मुंबई - मुंबई महापालिकेच्या सुधार समिती अध्यक्षपदी शिवसेनेचे अनंत (बाळा)नर यांची बिनविरोध निवड झाली आहे. बाळा नर हे वृत्तपत्र विक्रेते आहेत. एका वृत्तपत्र विक्रेत्याने नगरसेवक बनत महापालिकेतील वैधानिक पद असलेल्या सुधार समितीचे अध्यक्ष पद भूषवण्याचा मान मिळवला आहे.

महापालिका सुधार समिती अध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून अनंत (बाळा)नर यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु विरोधी पक्षाच्यावतीने कोणीही उमेदवारी अर्ज भरला नव्हता. गुरुवारी निवडणुकीची औपचारिकता पार पडल्यानंतर पिठासीन अधिकारी विश्वनाथ महाडेश्वर यांनी बाळा नर यांना विजयी घोषित केले.

बाळा नर हे जोगेश्वरीतील प्रभाग 77 मधून निवडून आले आहेत. सलग दुसऱ्यांदा ते नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. मागील वर्षी स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. त्यांनतर या महापालिकेत त्यांना सुधार समिती अध्यक्षपद देण्यात आले आहे. सन 2012 मध्ये नगरसेवक बनण्यापूर्वी वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करत होते. मात्र, शाखाप्रमुख आणि नगरसेवक बनल्यानंतर त्यांचा व्यवसाय सुरू आहे. मागील दहा वर्षांपासून हा व्यवसाय आपला भाऊ पाहत असल्याचे बाळा नर यांनी सांगितले. या व्यवसायात आपण अजूनही असल्याचे त्यांनी सांगितले. दिवसेंदिवस शहरातील वाढणाऱ्या जागांच्या भरमसाठ किमतीमुळे घर घेणे सर्वसामान्यांना अशक्य होत आहे. करदात्या नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने योजना अमलात आणावी, अशी सूचना बाळा नर यांनी आपल्या भाषणात केली.

पुढील बातमी
इतर बातम्या