मद्रास हायकोर्टाने एक आदेश देत तामिळनाडूतील शाळा-कॉलेज तसेच सरकारी कार्यालयांमध्ये आठवड्यातून किमान एकदा वंदे मातरम् म्हटले जावे, अशी सक्ती केली आहे. या निर्णयावर सपाचे आमदार अबू आझमी आणि एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. 'मानेवर सुरी ठेवा, देशाबाहेर काढा, पण वंदे मातरम् म्हणणार नाही', असे आझमी म्हणताच त्याचे पडसाद शुक्रवारी विधानसभेत उमटले.
'वंदे मातरम् म्हणू नका, असे कोणत्या धर्मग्रंथात आहे ते दाखवा', असे आव्हान देत या देशात राहायचे असेल तर वंदे मातरम् म्हणावे लागेल, असे भाजपा आमदार एकनाथ खडसे यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना ठणकावले.
भाजपा आमदार अनिल गोटे यांनी 'वंदे मातरम्'चा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. या देशात राहणाऱ्यांना वंदे मातरम् म्हणावे लागेल, असे गोटे म्हणाले. त्यावर आझमींनी आक्षेप घेतला. 'सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ता हमारा', 'हिंदुस्थान झिंदाबाद' असा जयघोष आम्ही हजारवेळा करू, मात्र वंदे मातरम् म्हणणार नाही'. 'वंदे मातरम् इस्लामच्या विरोधात आहे', असे आझमी म्हणाले.
'शिवाजी महाराजांचे अनेक सरदार मुस्लिम होते. त्यामुळे आम्ही देशविरोधी आहोत, असे पसरवू नका', असे अबु आझमी यांनी सांगताच खडसे आक्रमक झाले. 'इस देश में रहना होगा, तो वंदे मातरम् कहना होगा', असे त्यांनी ठणकावले. 'वंदे मातरम् गातच स्वातंत्र्यलढा लढला गेला आहे. मग त्यावर आक्षेप कशासाठी? या मातीत तुमचा जन्म झाला आहे. येथेच तुम्ही लहानाचे मोठे झाला आहात. येथेच तुम्ही घडला आहात आणि मृत्यूनंतर येथेच तुमच्यावर अंत्यसंस्कार होणार असतील, तर या मातीला वंदन करण्यात काय अडचण आहे?', असा प्रश्न खडसे यांनी यावेळी उपस्थित केला.
दरम्यान, सभागृहात उमटलेले पडसाद सभागृहाच्या बाहेर देखील उमटले. एमआयएमचे आमदार वारीस पठाण आणि भाजपा आमदार राज पुरोहित आमनेसामने आले. 'मै जय हिंद बोलुंगा, मगर वंदे मातरम कदापि नही बोलूंगा' असे वारीस यांनी ठणकावून सांगितले.
‘कोणताही खरा मुसलमान ‘वंदे मातरम’ गाणार नाही’. या सापोबांनी पुढे असाही डंख मारला आहे की, ‘आम्हाला देशातून बाहेर काढा, पण खरा मुसलमान कधीच ‘वंदे मातरम’ गाणार नाही.’ पठाण म्हणतात की, ‘माझ्या गळ्यावर सुरी ठेवली तरी मी ‘वंदे मातरम’ म्हणणार नाही’, 'महाराष्ट्र विधानसभेचे म्हणजे कायदेमंडळाचे दोन सदस्य, अशी राष्ट्रविरोधी भाषा वापरणार असतील तर फडणवीस यांचे कायद्याचे राज्य त्यांच्यावर कोणती कारवाई करणार आहे?', असा प्रश्न उद्धव यांनी सामना संपादकीयमध्ये उपस्थित केला आहे. विधानसभेने एक प्रस्ताव बहुमताने मंजूर करून दोन्ही आमदारांचे कायमचे निलंबन करावे, अशी मागणी उद्धव यांनी केली आहे.
'वंदे मातरमचा वाद उकरुन भाजपा आणि वारीस पठाणसारखी माणसे राजकीय पुड्या बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. दोघेही आपला माल बाजारात विकला जावा हे बघत आहेत. 1882 ते 1947 च्या काळात हे होते कुठे? राजपुरोहित यांनी पाकिस्तान व्हिसाची एजेन्सी घ्यावी. ही सगळी नौटंकी आहे. हाऊसमध्ये तमाशा करण्याचा यांचा हेतू आहे', अशी जोरदार टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.
हेही वाचा -