राज्यात कोरोनाचं संकट असताना दुसरीकडं राजकीय टीका, आरोप प्रत्यारोप जोरात सुरू आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यात काही दिवस शाब्दिक युद्ध सुरू होतं. आपत्ती पर्यटन अशी टीका केल्यानंतर फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना ‘नया है वह’ असा उपहासात्मक टोला लगावला होता. त्यानंतर फडणवीस यांनी केलेल्या टीकेला आदित्य ठाकरे यांनीही उत्तर दिलं होतं.
महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. रुग्णांच्या संख्येवरून विरोधी पक्षांनी नेहमीच सरकारवर टीका केली आहे. कोरोनाच्या चाचण्या पुरेशा होत नाहीत. रुग्णांची नेमकी संख्या आणि मृतांची आकडेवारी लपवली जाते, असा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अनेकदा केला आहे. महाविकास आघाडी सरकारनं हे आरोप वेळोवेळी फेटाळले आहेत. अशा वेळी अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राने मुंबईतील कोरोना रुग्णांची खरी आणि पारदर्शक आकडेवारी प्रसिद्ध केली जात आहे, असं म्हटलं आहे. यावरूनही आता आरोप-प्रत्यारोप दिसून येत आहेत. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी वॉशिंग्टन पोस्टमधील ही माहिती ट्विट केली आहे. सरकारवर आरोप करणाऱ्यांना त्यांनी हे अप्रत्यक्ष उत्तरच दिलं आहे.