महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून द्यायच्या सात जागांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. सात जागांसाठी आठ उमेदवारांचे अर्ज शुक्रवारी शेवटच्या दिवशी आले होते. राज्यसभेच्या निवडणुकीत आठव्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज छाननीमध्ये बाद झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. सोमवारी विधान भवनात कक्ष क्रमांक ७१२ मध्ये झालेल्या छाननी समितीच्या बैठकीत एक अर्ज बाद झाल्याने राज्यसभा निवडणूक बिनविरोध झाली.
छाननीच्या बैठकीवेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, स्वत: उमेदवार फौजिया खान आदी मंडळी उपस्थित होती. महाविकास आघाडीचे ४, तर भाजपाचे ३ खासदार राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा परवा १८ मार्च रोजी होणार आहे. निवडणुकीत अर्ज मागे घेण्याची मुदत १८ मार्च आहे. ही मुदत टळल्यानंतर आयोगाकडून निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले जाणार आहे. त्यामुळे आता घोषणेची औपचारिकता उरली आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी २६ मार्च रोजी निवडणूक होणार होती. या निवडणूकीसाठी अर्ज भरण्याचा शुक्रवारी १३ मार्च हा शेवटचा दिवस होता. राष्ट्रवादीचे शरद पवार, रिपाइंचे रामदास आठवले, भाजपाचे उदयनराजे भोसले यांनी सर्वप्रथम आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शेवटच्या दिवशी शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फौजिया खान, काँग्रेसचे राजीव सातव आणि भाजपचे डॉ. भागवत कराड अशा चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, तर राजेंद्र चव्हाण नावाच्या एका उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अर्जांची संख्या आठ इतकी झाली होती. त्या अर्जांची छाननी सोमवारी दुपारी १२ वाजता पार पडली. त्यात चव्हाण नावाच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे सात जागांसाठी सातच अर्ज वैद्य राहिल्याने आता मतदान घेण्याची आवश्यकता उरलेली नाही.
रामदास आठवले यांना भाजपकडून केंद्रात सामाजिक न्याय राज्यमंत्रीपद देण्यात आलेले आहे. मात्र त्यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपल्याने त्यांचे मंत्रिपद अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र भाजपने दिलेला शब्द पाळला असून ते राज्यसभेवर सदस्य म्हणून निवडले गेले असल्याने त्यांच्या मंत्रिपदाला आता कसलीही अडचण नसल्याचे बोलले जात आहे.