सचिन वाझे यांची तात्काळ बदली, गृहमंत्र्यांची घोषणा

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून अधिवेशनात भाजपने आक्रमक भूमिका घेत पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या निलंबनाची आणि अटकेची केली होती. आता सचिन वाझे यांची बदली होणार आहे. वाझे यांची तात्काळ बदली करण्यात येणार असल्याची  घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत केली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्याच्या कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावर विधानपरिषदेत निवेदन सादर केलं. यावेळी सचिन वाझे यांची क्राइम ब्रांचमधून बदली करुन इतर ठिकाणी नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली. या प्रकरणाचा तपास हा एटीएसकडे दिला आहे. या प्रकरणात जो दोषी आढळतील, त्यावर कडक कारवाई केली जाईल, असंही देशमुख यांनी स्पष्ट केलं. मात्र, भाजप आमदारांनी सचिन वाझे यांना निलंबित करण्यात यावे आणि अटक करण्यात यावी अशी मागणी करत जोरदार गोंधळ घातला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. 

अनिल देशमुख यांनी निवदेनाच्या सुरुवातीला राज्यातील गुन्हेगारीची आकडेवारी दिली. मात्र यावरुन विरोधकांनी गदारोळ घालत सचिन वाझेंवर काय कारवाई करणार आहे अशी विचारणा केली, अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितलं की, सचिन वाझेंवर नियमानुसार कारवाई होईल. सध्या क्राइम ब्रांच जिथे ते कामाला आहेत तिथून हलवून दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती करण्यात येईल. निष्पक्षपणे चौकशी करुन जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. 

पुढील बातमी
इतर बातम्या