मनसे लोणच्याएवढीही उरली नाही, शिवसेना नेत्याची राज ठाकरेंवर टीका

शिवसेना आमदार आणि नवनियुक्त पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आपल्या आक्रमक भाषणामुळे नेहमीच चर्चेत असतात. यंदा मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर टीका करताना त्यांची जीभ चांगलीच घसरली. यामुळे नाराज मनसैनिकांकडून पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध होत आहे.

नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २६ मधील पोटनिवडणुकीत उभे असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार मधुकरराव जाधव यांच्या प्रचारासाठी गुलाबराव पाटील नाशिकमध्ये आले होते. या सभेत त्यांनी भाजपसोबत मनसेवरही जोरदार टीका केली. त्याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही खालच्या शब्दांत टीकेचे बाण सोडले.

हेही वाचा- ‘मनसे’च्या झेंड्याचा रंग बदलणार?

आपल्या भाषणात पाटील म्हणाले, एक पानवाला आज राज्याचा कॅबिनेट मंत्री आहे. ही किमया बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्येच होते. मनसे आता आहे तरी कुठे? बाळासाहेबांसोबत ज्यांनी गद्दारी केली, त्यांचा सत्यानाश झाला आहे. तुमच्या भागात तरी मनसे पक्ष थोडाफार उरलाय, आमच्याकडे तर लोणच्याएवढा देखील उरलेला नाही. ठाकरे आडनाव आहे, म्हणून ‘त्यांना’ थोडंफार वलय आहे. नाहीतर कुठेतरी बाजूला पडले असते. फारतर त्यांचं नाव कुठल्यातरी संगीतकारांमध्ये असतं.

भाजपवाले म्हणतात हे सरकार चालणार नाही? म्हणजे तुम्ही कोणाशीही युती केलेली चालते आणि आम्ही केली की चालत नाही? असं म्हणत त्यांनी भाजपचाही समाचार घेतला.

दरम्यान शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मिळून सत्ता स्थापन केल्याने आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात असलेल्या मनसेकडून हिंदुत्वाचं ट्रम्प कार्ड खेळलं जाण्याची शक्यता आहे. २३ जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंतीदिनी मनसेचं महाअधिवेशन होत असून या अधिवेशनात मनसेच्या नव्या झेंड्याचं दर्शन होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- सत्ता संघर्षाच्या खेळात नाराजांची भेळ!

पुढील बातमी
इतर बातम्या