...म्हणून शपथविधीला गेलो नाही - संजय राऊत

महाविकास आघाडी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार सोमवारी झाला. या सोहळ्याला महाविकास आघाडीचे शिल्पकार खासदार संजय राऊत हे गैरहजर होते. त्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. बंधू सुनील राऊत यांना मंत्रीपद न दिल्याने नाराज असलेले संजय राऊत यांनी शपथविधी सोहळ्याकडं पाठ फिरवल्याची चर्चा होती. मात्र, संजय राऊत यांनी याबाबत खुलासा केला आहे. आपण कोणत्याही शासकीय कार्यक्रमाला जात नाही. त्यामुळे गैरहजर होतो, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

राऊत म्हणाले की,  इतक्या वर्षात मी शक्यतो कोणत्याही शासकीय कार्यक्रमाला गेलेलो नाही. मी शासकीय कार्यक्रमांना जात नसल्याने गैरहजर होतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला उपस्थित राहण्याबद्दल विचारलं असता उद्धव ठाकरेंचा शपथविधी अपवाद होता, ते राज्याचे मुख्यमंत्री झाले होते असं त्यांनी म्हटलं. 

विरोधकांनी शपथविधीच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. यावर राऊत यांनी टीका केली. ते म्हणाले की, चहा-पानावर बहिष्कार टाकणं ठीक आहे पण शपथविधीवर बहिष्कार टाकण्याची पद्धत चुकीची आहे. विरोधी पक्षाची जनतेशी बांधिलकी आहे. त्यांनी अशाप्रकारे बहिष्काराचं शस्त्र वारंवार उपसू नये अन्यथा ते बोथट होईल. जनतेचा विरोधी पक्षावरील विश्वास उडून जाईल. दरम्यान ८ तारखेला औद्योगिक बंद पुकारण्यात आला असून त्याला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचं संजय राऊत यांनी जाहीर केलं आहे.


हेही वाचा -

उद्धवा अजब तुझे सरकार- किरीट सोमय्या

मंत्रिमंडळात अवघ्या ३ महिला, शिवसेनेकडून महिलेला संधी नाही


पुढील बातमी
इतर बातम्या