२० डिसेंबरला शिवस्मारकाचं पुन्हा भूमिपूजन!

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारलं जात असून या स्मारकाचं भूमिपूजन डिसेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. २ महिन्यांपूर्वी स्मारकाच्या बांधकामाला देखील सुरूवात करण्यात आली आहे. असं असताना आता पुन्हा एकदा शिवस्मारकाचं भूमिपूजन करण्याचा घाट सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शिवस्मारक समितीनं घातला आहे.

शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या हस्ते २० डिसेंबरला भूमिपूजन होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासंबंधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी भूमिपूजनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

पायाभरणी कार्यक्रमात अपघात

सुमारे ३६०० कोटी रुपये खर्च करत शिवस्मारकाची उभारणी केली जात असून हे काम 'एल अॅण्ड टी' कंपनीला देण्यात आलं आहे. २०१६ मध्ये स्मारकाचं भूमिपूजन झाल्यानंतर स्मारकाच्या प्रत्यक्ष बांधकामाला २ महिन्यांपूर्वीच सुरूवात झाली आहे. भराव टाकण्याचं काम सुरू करण्याआधी शिवस्मारक समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि 'एल अॅण्ड टी'नं २ महिन्यांपूर्वी पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र या कार्यक्रमाला जातानाच अरबी समुद्रात २५ जणांना घेऊन जाणारी बोट कलंडली होती. यात अपघातात शिवसंग्राम संघटनेचा कार्यकर्ता सिद्धेश पवार याचा मृत्यू झाला होता.

पुन्हा गरज काय?

या अपघातानंतर चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचा अहवाल येणं बाकी आहे. असं असताना सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शिवस्मारक समितीनं भूमिपूजनाचा घाट घातला आहे तो ही दुसऱ्यांदा. या भूमिपूजनासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी 'मुंबई लाइव्ह'नं संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भूमिपूजन होणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र याविषयी अधिक काहीही माहिती देण्यास वा पुन्हा भूमिपूजनाची गरज का? तसंच बोट अपघातानंतर पुन्हा भूमिपूजनाची घाई का? यावर चुप्पी साधली आहे.


हेही वाचा-

राज ठाकरे मच्छिमारांच्या पाठिशी, समस्या सोडवा नाहीतर, काम बंद पाडू, मनसेचा इशारा

सरकारने न्यायालयाला फसवलं? की न्यायालयाने देशाला? - उद्धव ठाकरे


पुढील बातमी
इतर बातम्या