मंत्रिमंडळात अवघ्या ३ महिला, शिवसेनेकडून महिलेला संधी नाही

महाविकास आघाडी सरकारचा सोमवारी मंत्रीमंडळ विस्तार होऊन ३६ मंत्र्यांनी शपथ घेतली. मंत्रीमंडळात अनुभवी मंत्र्यांसह तरुणांनाही संधी देण्यात आली आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारमध्ये अवघ्या ३ महिलांना मंत्रीपद मिळालं आहे. यामधील २ महिला कॅबिनेट मंत्री असणार आहेत. 

काँग्रेसने यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने अदिती तटकरे यांना राज्यमंत्रीपदाची संधी दिली आहे. शिवसेनेकडून मात्र महिला आमदाराला मंत्रीपद देण्यात आलेलं नाही. शिवसेनेच्या दोन महिला आमदार निवडून आल्या आहेत. चोपडा मतदारसंघातून लता सोनावणे आणि भायखळा मतदारसंघातून यामिनी जाधव निवडून आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून तासगाव मतदारसंघातून सुमनताई पाटील, श्रीवर्धनमधून अदिती तटकरे, देवळालीतून सरोज अहिरे विजयी झाल्या. त्यापैकी अदिती तटकरे यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. 

काँग्रेसमधून तिवसा मतदारसंघातून यशोमती ठाकूर, सोलापूर शहर मध्यतून प्रणिती शिंदे,  अमरावती मतदारसंघातून सुलभा खोडके, वरोरातून प्रतिभा धानोरकर, धारावी मतदारसंघातून वर्षा गायकवाड आदी विजयी झाल्या. त्यापैकी प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं. देवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीच्या मंत्रिमंडळात  पंकजा मुंडे या कॅबिनेट मंत्री तर विद्या ठाकूर राज्यमंत्री होत्या. 

महाराष्ट्र विधानसभेत यंदा २४ महिला आमदार निवडून आल्या आहेत. सध्याच्या विधानसभेत महिला आमदारांचे प्रमाण ८.३ टक्के असून आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे. २०१४ च्या विधानसभेत २० महिला आमदार निवडून आल्या होत्या. 


हेही वाचा -

संजय राऊत नाराज?, शपथविधी सोहळ्याला दांडी

राज्यपाल के. सी.पाडवींवर संतापले, पुन्हा घ्यायला लावली शपथ


पुढील बातमी
इतर बातम्या