मराठा आरक्षणाचे मुंबईच्या डबेवाल्यांकडून गुलाल उधळून स्वागत

 मराठा समाजाला शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षण मिळालं आहे. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमतानं या विधेयकाला मंजूरी देण्यात आली. त्यामुळं मराठा समाजातील नेते, कार्यकर्ते, ठिकठिकाणी मिठाई वाटून आनंद साजरा करत आहेत. मुंबईच्या डबेवाल्यांनी देखील मिठाई वाटून आणि गुलाल उधळून स्वागत केले आहे.

डबेवाल्यांचेही लक्ष 

मराठा आरक्षणाला सभागृहाची मंजुरी केव्हा मिळते याकडे डबेवाल्यांचेही लक्ष लागले होते. कारण डबेवाले मावळ भागात राहणारे मराठा आहेत. त्यामुळं या आरक्षणाचा डबेवाल्यांना देखील फायदा होणार आहे, असं मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी म्हटलं अाहे. 

विकासाचे नवे दालन

आरक्षणामुळे आम्हाला म्हाडाच्या घरांच्या लाॅटरीत लाभ मिळेल. मुलांना शाळा, काॅलेजात प्रवेश शुल्क व फी मध्ये सवलत मिळेल. त्यानंतर पुढे त्यांना नोकरीत आरक्षण मिळेल आणि नोकऱ्या मिळतील. या आरक्षणाने खऱ्या अर्थाने मराठा समाजाला विकासाचे नवे दालन खुले झाले आहे, असं मत सुभाष तळेकर यांनी व्यक्त केलं आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या