फुकाचा तमाशा कि राजकीय आशा?

मनसेचे मुंबईतील सहा नगरसेवक शिवसेनेने चोरून नेल्याचे आरोप सध्या होत आहेत. आपले सहा नगरसेवक आपल्याला सोडून गेल्याचं दुःख नक्कीच मनसेला झालं असणार. यातून त्यांचा संताप होणं स्वाभाविक आहे. पण संतापाचा कडेलोट होणार नाही, पातळी घसरणार नाही, याची काळजी एक राजकीय पक्ष म्हणून त्या पक्षाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी घ्यायला हवी.

मुळात हे नगरसेवक म्हणजे काही वस्तू नाही की जी लपवून गुप्त जागी ठेवली होती आणि ती चोरून नेली! हे नगरसेवक आहेत. जेव्हा पालकांचं मुलांवर लक्ष नसलं, की मुलं वाह्यात होतात, वाम मार्गाला जातात. तसेच या मनसेच्या 6 नगरसेवकांबाबत बोलता येईल. ज्यांनी मनसेला राम राम केला आणि शिवबंध हाती बांधून शिवसेनेत प्रवेश केला त्यांच्यावर पक्षाचे प्रमुख म्हणून लक्ष असणं आवश्यक होतं. ते नसल्यामुळे आज पक्ष सोडून जाण्याची वेळ त्यांच्यावर आली, हे सत्य नाकारून चालणार नाही. परंतु, हे नगरसेवक का सोडून गेले? याचं आत्मपरीक्षण राज ठाकरे यांनी करायला हवं.

राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर जे आपली निष्ठा व्यक्त करत त्यांच्या सोबत येतात, कायम आपली निष्ठा राज साहेबांच्या चरणी अर्पण करतात, तीच निष्ठावान माणसं अशी चुटकीसरशी निर्णय घेऊन सोडून कशी जाऊ शकतात? याचा विचारही आज राज ठाकरे यांनी करायला हवा.

दिलीप लांडे, परमेश्वर कदम, दत्ता नरवणकर, अर्चना भालेराव, हर्षला मोरे आणि अश्विनी माटेकर या सहा नगरसेवकांना शिवसेनेने फोडल्यानंतर आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत. कुणी म्हणतंय भावाने भावाच्या पाठीत खंजीर खुपसला, कुणी म्हणतंय 5 कोटी रुपये देऊन त्यांना विकत घेतलंय, त्यांची लाचलुचपत आणि आर्थिक गुन्हे शाखाच्या माध्यमातून चौकशी करा, कुणी म्हणतंय शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक. पण कोणीही काहीही म्हणत असलं, तरी शिवसेनेनं जे डोकं वापरलं, त्याची दाद द्यायला हवी. आता यामागचा मास्टर माईंड कोण? यापेक्षा ज्यांना फोडलं, ते नियमात बसवून. याचे दूरगामी परिणाम भविष्यात वेगळे असले तरी रणनीती मात्र चांगली होती.

भविष्याचे परिणाम या शब्दामागचा अर्थबोध लक्षात घ्यावा. शिवसेनेने जरी नियमात एक गट करून मनसेचे नगरसेवक फोडले असले, तरी किरीट सोमय्या यांनी दिलेल्या पत्रानुसार आर्थिक गुन्हे शाखा आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या माध्यमातून चौकशीचा ससेमिरा त्यांच्यामागे लागू शकतो. या चौकशीमुळे निर्णय प्रलंबित राहू शकतो. या सर्वांना निलंबित करून त्या ठिकाणी पोटनिवडणूक होणे शक्य नाही. अर्थात जे काही आहे ते कोकण विभागीय आयुक्तांच्या हाती.

बरेच जण असं विचारतात की शिवसेनेला हे करायची खरोखरच गरज होती का? या प्रश्नाचं उत्तर आज कदाचित तुम्हाला पटणारं नसेल. पण राजकारणात कधी कधी समोरच्याच्या डावापूर्वी आपला डाव टाकणे यालाच राजकारण म्हणतात. समोरच्याची खेळी ओळखूनच आपली खेळी करायची असते, ती त्यांनी खेळली. हीच खेळी जर त्यांनी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात खेळली असती, तर कदाचित त्यांचं टायमिंग चुकलं असतं.

येणाऱ्या मार्च आणि एप्रिल महिन्यात ज्या वैधानिक आणि विशेष समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुका होणार आहेत, त्या सुरळीत करण्यासाठी आज शिवसेनेने डाव खेळला. आणि भाजपाचा जो संताप होतोय तो याचसाठी! त्यांचा प्लॅन ए फेल झाला. परंतु, शिवसेनेप्रमाणे भाजपा काही एका प्लॅनवर मोहीम हाती घेत नाही. प्लॅन ए जर अनसक्सेस झाला असेल, तर प्लॅन बी भाजपाने राबवायला हवा. 'जहाँ सामने वाले की सोच खतम होती है, वहा हमारी सोच शुरु होती है' हे डायलॉग भाजपावाले मारत असतात. त्यामुळे भाजपाने आपला प्लॅन बी बाहेर काढून नवीन राजकीय खेळीचे फासे टाकावेत. जनतेचं तरी भाजपाच्या खेळीकडे लक्ष आहे.

आधी किरीट सोमय्या यांनी आरोप केले की शिवसेनेने नगरसेवकांना प्रत्येकी 3 कोटी वाटले. त्यानंतर राज ठाकरे यांनी प्रत्येकी 5 कोटी वाटल्याचे आरोप केले. पण यात किती तथ्य आहे? याबाबत मात्र शंका आहे. पैसे दिले हा आरोप निराधार असून येणाऱ्या समित्यांच्या निवडणुकीत अध्यक्षपदाचं आमिष नक्कीच दाखवलं असेल. मोठ्या समितीवर सदस्य म्हणून ते त्यांना घेऊ शकतात. त्यामुळे हा आरोप अंशतः खरा असला, तरी त्यात तथ्य नसावं. येणाऱ्या दिवसांत ते स्पष्ट होईलच. किरीट सोमय्या म्हणतात की हा पैसा हवाला मार्फत दिला. आता यावर विश्वास कुणी ठेवायचा?

भाजपा सध्या तरी पहारेकऱ्यांच्या भूमिकेत आहे. पण सत्ताधारी पक्षापेक्षा जास्त चलती ही भाजपाचीच आहे. त्यामुळे सत्तेत असलं काय आणि नसलं काय, त्याचा त्यांना फरक पडत नाही. पण एवढी वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर सत्तेपासून दूर राहणे भाजपलाही परवडणारे नाही. भाजपाला विरोधी पक्षात बसायचं नाही. त्यामुळे सत्तेत बसण्याची रणनीती त्यांनी नक्कीच आखली असेल. ती साकारण्यासाठी ते काही दिवस वाट पाहतील. पण तोपर्यंत जे शिवसेनेत गेले, त्यांच्या प्रवेशावर निर्बंध आणून त्यांना कसे अडकवता येईल? हेच त्यांचे प्रयत्न राहणार आहेत. राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्या गुप्त भेटीचं हेच रहस्य असू शकेल, अशीही चर्चा ऐकायला मिळत आहे. असो. यामध्ये केवळ राजकारण असून हा केवळ फुकाचा तमाशा ठरणार नाही, म्हणजे झाले!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या