शेअर बाजारात २ दिवसांत ५ लाख कोटींचा चुराडा कसा झाला?

आर्थिक वर्ष २०१९-२० करीता सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात शेअर बायबॅक टॅक्स लावण्याची तसंच नोंदणीकृत कंपन्यांमध्ये किमान पब्लिक शेअरहोल्डिंग वाढवण्याच्या घोषणेमुळे देशांतर्गत बाजारात निराशेचं वातावरण तयार झालं आहे. परिणामी मागील २ दिवसांत आलेल्या घसरणीमुळे सेन्सेक्स ११८८ अंकांनी कोसळला असून यामुळे गुंतवणूकदारांच्या ५.६१ लाख कोटी रुपयांचा अक्षरश: चुराडा झाला आहे. 

अर्थसंकल्पातून निराशा

केंद्रीय अर्थसंकल्पातून नव्या सवलती मिळतील या आशेवर असलेला शेअर बाजार ४ जुलैपर्यंत वाढ नोंदवत ३९,९०८ अंकांवर बंद झाला. ५ जुलै रोजी अर्थसंकल्प सादर होईपर्यंत बाजारात तेजी होती.  परंतु अर्थसंकल्पात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी कुठलीही मोठी घोषणा नसल्याने बाजारात निराशा पसरली. त्यामुळे ५ जुलै रोजी सेन्सेक्स ३९१ अंकांच्या घसरणीसह ३९,५१३ अंकांवर बंद झाला. 

११८८ अंकांची घसरण

पुढच्याच दिवशी ६ आणि ७ जुलै रोजी शेअर बाजार बंद होता. या दरम्यान अर्थसंकल्पातील तरतूदी समोर आल्याने ८ जुलै रोजी सेन्सेक्स २५० अंकांच्या घसरणीसह खुला झाला आणि दिवसअखेर ७९२ अंकांच्या घसरणीसह ३८,७२० अंकांवर बंद झाला. त्यानुसार ५ आणि ८ जुलै अशा दोन सत्रात सेन्सेक्समध्ये एकूण ११८८ अंकांची घसरण नोंदवण्यात आली. 

मार्केट कॅप घटली

४ जुलै रोजी सेन्सेक्स १,५३,५८,०७५ कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह बंद झाला होता. ५ जुलैच्या घसरणीसह सेन्सेक्सची मार्केट कॅप १,५१,३५,४९५ कोटी रुपये एवढी झाली. तर ८ जुलैला बाजारात पुन्हा एकदा घसरण झाल्याने मार्केट कॅप आणखी घटून १,४७,९६,३०२ कोटी रुपयांवर आली. अशा रितीने २ दिवसांत मार्केट कॅपमध्ये ५,६१,७७३ कोटी रुपयांची घट होऊन गुंतवणूकदारांचे ५.६१ लाख कोटी रुपये बुडाले.  


हेही वाचा-

अर्थसंकल्पानंतर घसरण सुरूच, सेन्सेक्स ६६५ अंकांनी कोसळला

पेट्रोल, डिझेल अडीच रुपयांनी महागले


पुढील बातमी
इतर बातम्या